पालिकेचा खेळाडूंच्या जीवाशी खेळ
| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
पनवेल पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या शहरातील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीतील मैदानाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेसह आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे अकादमीचे नाव मोठे, तर दुसरीकडे मैदानाची अवस्था पाहता केला जात आहे.
स्थानिक क्रिकेट टॅलेंटला योग्य प्रशिक्षण आणि प्लॅटफॉर्म देण्यासाठी नवीन पनवेल सेक्टर 11 येथील राजीव गांधी मैदानत कोट्यवधी रुपये खर्च करून दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी आणि मैदान विकसित करण्यात आले आहे. ही अकॅडमी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या दिलीप वेंगसरकर फॉऊंडेशन मार्फत चालवली जाते. या करिता 2022 मध्ये पनवेल महानगरपालिका आणि वेंगसरकर फाऊंडेशन यांच्यात करार झाला होता. त्यामुळे ही क्रिकेट अकॅडमी पनवेलसह नवी मुंबई परिसरातील एक महत्त्वाची क्रीडा सुविधा मानली जाते. परंतु, सध्या या मैदानाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. या मैदानावर ठिकठिकाणी गवत पूर्णपणे नष्ट झाले असून मोठ्या प्रमाणात कोरडी माती दिसून येत आहे. परिणामी संपूर्ण मैदान असमतोल झाले आहे.
सरावादरम्यान चेंडूचा बाऊन्स अनियमित होत असून फलंदाजांना मोठा धोका निर्माण होत आहे. फील्डिंग करताना खेळाडूंना जखमी होण्याचा धोका वाढला असून, एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खेळाडू व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘फक्त नावापुरती अकादमी नको, दर्जेदार सुविधा द्या’ अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, काट्यवधी रुपये खर्च करूनही मैदानाची देखभाल होत नाही. याकडे संबंधित प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तातडीने मैदानाचे सपाटीकरण, गवत लागवड व देखभाल करण्याची मागणी या मुळे खेळाडूनचे पालक करत आहेत.
मैदानाची जबाबदारी कोणाकडे?
पनवेलमधील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानाची दयनीय अवस्था समोर आली आहे. या प्रकल्पात पनवेल पालिका आणि दिलीप वेंगसरकर फॉऊंडेशन या दोन संस्था सहभागी आहेत. पालिकेकडे मैदान व इन्फ्रास्ट्रक्चरची मालकी असून मोठी दुरुस्ती, विकासकामे आणि एकूण प्रशासनाची जबाबदारी आहे. तर, फाऊंडेशनकडे अकॅडमीचे संचालन, प्रशिक्षण, खेळाडू व्यवस्थापन आणि रोजची देखभाल सोपवण्यात आली आहे. असे असतानाही या मैदानाकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मैदानाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
धोकादायक खेळपट्टी
खेळपट्टीवर गवत फार कमी आणि असमान आहे. माती कोरडी व तडकलेली दिसते. पृष्ठभाग खडबडीत आणि यूनिवेन आहे. काही ठिकाणी हार्ड पॅच आणि सॉफ्ट पॅच एकत्र दिसतात. परिणामी चेंडू अनियमित उसळी घेत असल्याने गोलंदाजाला अनपेक्षित मूव्हमेंट मिळते. त्यामुळे फलंदाजाला इजा होण्याचा धोका वाढत असल्याचे मत जानकरांनी व्यक्त केले आहे.
