| पनवेल | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार लता धनराज (डीबी बाई) म्हात्रे आणि चिंद्रण पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार बाळू गोमा वारा यांच्या प्रचाराची सोमवारी चिंद्रण मतदार संघात भव्य अशी रॅली काढली होती. या भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन वावंजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डी.बी.बाई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. या रॅलीमध्ये शेकाप-महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असल्यामुळे चिंद्रण ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आवाज दुमदुमला. यादरम्यान कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार आणि शेकापचे नेते बाळाराम पाटील यांनी भेट दिली. आपल्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं चिंद्रण हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचाच राहिलेला आहे आणि तो शेकापचाच राहणार. मात्र, आपण यावेळी या मतदारसंघातून मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या प्रचार रॅलीत पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन कडू, बाबुशेठ आदईकर, गोटीराम पाटील, जोमाशेठ आदईकर, अनिल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
चिंद्रणमध्ये शेकापची प्रचारात आघाडी
