रायगडच्या जनतेचा सरकारला सवाल

संपणार कधी खड्ड्यांचे विघ्न; प्रवास करणे झाले मुश्किल

| अलिबाग | प्रमोद जाधव |

प्रवाशांना निश्चित स्थळी पोहचता यावे यासाठी जिल्हयात रस्त्याचे जाळे उभारण्यात आले. राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे करण्यात आली. परंतू याच रस्त्यांवरून सुखकर व आरामदायी प्रवास होणे म्हणजे शंकाच निर्माण होत आहे. मुंबई- गोवा महामार्गासह जिल्ह्यातील अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहे. कोट्यावधी रुपये खर्च करूनदेखील आजही खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. गणरायाचे आगमन 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. यंदाही खड्ड्यातून प्रवास होणार असल्याचे चित्र समोर येत आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी 2011 पासून मुंबई-गोवा या चार पदरी रस्त्याचे काम सुरू झाले. परंतू आजही या रस्त्याची अवस्था बिकट आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अलिबाग-वडखळ, माणगाव – इंदापूर पेण – पनवेल रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. दर वर्षी पावसाळ्यात खड्ड्यातूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येते .

पनवेल-पेण, वडखळ-अलिबाग कोलाड, माणगाव-इंदापूर तसेच अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा मुरुड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी त्रस्त झाले आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची अवस्था आजही बिकट आहे. रस्त्यावर मोठ मोठे खडडे पडले आहेत. या खड्ड्यातून दुचाकीसह चारचाकी वाहने चालविणे जिकरीचे होऊ लागले आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहतूक कोंडी व अपघाताचे संकट वाढण्याची भिती वाढली आहे. खडड्यांमुळे प्रवासी त्यांच्या निश्चित स्थळी वेळेवर पोहचू शकत नाहीत. वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. त्याचा नाहक त्रास चालकांसह प्रवाशांना होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलीसांना कंबर कसावी लागत आहे. खडड्यांतून वाहन चालवताना वाहनांमध्ये बिघाड होण्याबरोबरच प्रवासी व चालकांना कंबर दुखीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रवाशांच्या या समस्येकडे गांभिर्याने पाहीले जात नाही अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. चालकांसह प्रवासी व पर्यटकांना चांगल्या दर्जेदार रस्त्याची प्रतिक्षा लागून राहीली आहे.

यंदाही चाकरमान्यांचे बेहाल
गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. गणरायाचे आगमन 19 सप्टेंबरला घरोघरी होणार आहे. सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापासून गणरायाच्या स्वागताची लगबग सुरु होणार आहे. चाकरमानीदेखील येण्याची तयारी करणार आहेत. मात्र यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खड्ड्यातून होण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक भागांमधील रस्ते खड्डेमय झाले आहेत.

पनवेल ते इंदापूरच्या रस्त्याचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील 14 किलो मीटर अंतरावर काँक्रीटीकरण केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एक किलो मीटरचे काम झाले आहे. पावसामुळे काम थांबले आहे. पावसाने उघडीप घेतल्यावर काम सुरु केले जाईल. तसेच काही रस्त्यांचे मजबुतीकरणन झाल्याने खड्डे पडले आहेत. त्या रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. पेव्हर ब्लॉक, खडी, मातीद्वारे खड्डे बुजविले जात आहेत.

यशवंत घोटकर- कार्यकारी अभियंता
राष्ट्रीय महामार्ग

अलिबाग – रोहा मार्गावरील रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरु केले आहे. काही भागात काँक्रीटीकरण झाले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या सुचना उपअभियंता यांना देण्यात आले आहे. रस्त्यांवरील खडडे बुजवण्याचे काम सुरू आहे. पाऊस थांबल्यास डांबरीकरणाचे काम केले जाईल . अलिबाग – रोहा मार्गावरील काही भागात खडडे आहेत. ते खडडे बुजवण्याच्या सुचना केल्या आहेत.

जे.ई. सुखदेवे – कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग – अलिबाग
Exit mobile version