पेण पंचायत समितीत शिस्तभंगाचा कळस

“हम नहीं सुधरेंगे”चा कारभार उघड

| पेण | प्रतिनिधी |

“कुत्र्याची शेपुट नळीत घातली तरी ती वाकडीच” ही म्हण पेण पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर अक्षरशः लागू पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी नव्याने निवडून आलेल्या सभापती, उपसभापती आणि लोकप्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याची स्पष्ट तंबी दिली होती. मात्र, त्या सूचनांकडे सरळ दुर्लक्ष करत “हम नहीं सुधरेंगे” अशीच भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे वास्तव समोर आले आहे.

बुधवारी (दि. 18) सकाळी 9.50 वाजता कार्यालयात पाहणी केली असता संपूर्ण पंचायत समिती कार्यालयात अक्षरशः शुकशुकाट होता. बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे बंद होता, तर शिक्षण विभागातही एकही कर्मचारी हजर नव्हता. कृषी विभागात केवळ एक कर्मचारी, अर्थ विभागात एक, सामान्य प्रशासन विभागात तीन, ग्रामपंचायत विभागात तीन आणि बांधकाम विभागात दोन कर्मचारी उपस्थित होते.

एकूण 36 कर्मचाऱ्यांपैकी फक्त 16 कर्मचारीच कार्यालयात उपस्थित होते, तर उर्वरित कर्मचाऱ्यांचा कोणताही ठावठिकाणा नव्हता. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, कार्यालयात बसवलेली बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा पूर्णपणे बंद अवस्थेत असून, ती केवळ दिखाव्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “दहा मिनिटांत सर्व कर्मचारी हजर होतील” असे सांगितले. मात्र, 15 मिनिटे उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. कार्यालयीन शिस्तीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र असताना, या कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्याच्या सवयीवर नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी आळा घालणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version