झाडाला धडकून विमान कोसळले

अजितदादांच्या विमान अपघाताचा 22 पानी प्राथमिक अहवाल जाहीर

| मुंबई | प्रतिनिधी |

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा 22 पानी प्राथमिक तपास अहवाल जाहीर झाला असून, त्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातावेळी विमान प्रथम झाडाला धडकले आणि त्यानंतर जमिनीवर कोसळले, अशी स्पष्ट नोंद अहवालात करण्यात आली आहे. धडकेनंतर झालेल्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेत ‌‘ब्लॅक बॉक्स‌’मधील उड्डाण माहिती नोंदक (फ्लाईट डेटा रेकॉर्डर) बाधित झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अपघाताचे अंतिम कारण अद्याप स्पष्ट नसले तरी प्राथमिक निरीक्षणांमुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, या अपघात अजितदादांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Aircraft Accident Investigation Bureau (विमान अपघात तपास विभाग) यांनी हा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अपघातावेळी केवळ सुमारे दोन हजार मीटर इतकीच दृश्यमानता होती. विमान धावपट्टीपासून सुमारे 50 मीटर अंतरावर कोसळल्याची नोंद आहे. धडकेनंतर मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे उड्डाण माहिती नोंदक तसेच कॉकपीट ध्वनिमुद्रक यांचे नुकसान झाले. अहवालानुसार अपघात एका कारणामुळे नव्हे, तर हवामान, पायाभूत सुविधा आणि कार्यवाहीतील निर्णय यांच्या एकत्रित परिणामामुळे घडल्याचा तात्पुरता निष्कर्ष काढण्यात आला आहे. अंतिम निष्कर्ष मात्र कॉकपीट ध्वनिमुद्रक (सीव्हीआर) आणि उड्डाण माहिती नोंदक (एफडीआर) यांच्या सविस्तर विश्लेषणानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्राथमिक तपासात काही संभाव्य कारणांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये नियमांनुसार अपेक्षित किमान दृश्यमानतेपेक्षा कमी दृश्यता, नियंत्रित नसलेले विमानतळ, टेबल-टॉप प्रकारची धावपट्टी, फिकट धावपट्टी चिन्हांकन, धावपट्टीवर सैल खडी, अपुरी कुंपण व्यवस्था, दृश्य भ्रम तसेच हवामानविषयक माहितीची मर्यादित अचूकता यांचा समावेश आहे. अपघातावेळी विमानाने तात्काळ नियंत्रण गमावल्याचे संकेतही अहवालात देण्यात आले आहेत.

दरम्यान, ‌‘ब्लॅक बॉक्स‌’मधील माहिती सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी अमेरिकन तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. संबंधित उपकरण तयार करणाऱ्या अमेरिकन कंपनीचे पथक भारतात येऊन तांत्रिक तपास करणार आहे. अपघातानंतर विविध पातळ्यांवरून वेगवेगळे दावे करण्यात आले होते. काहींनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर जाहीर झालेला प्राथमिक अहवाल महत्त्वाचा मानला जात असला, तरी अपघाताचे नेमके कारण समोर येण्यासाठी अंतिम सविस्तर अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Exit mobile version