कर्जत नगरपरिषदेच्या कचरा संकलन डब्यांची दुर्दशा

स्वच्छता दुतांचे आरोग्य धोक्यात
। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषदेच्या कचर्‍याच्या घंटागाडीत कचरा संकलन करून टाकणार्‍या डब्यांची सद्य परिस्थितीत भयंकर आणि बिकट दुरावस्था झाली आहे. शहरातील विविध प्रकारचा कचरा एकत्र संकलन करून तो सर्व कचरा घंटागाडीत ज्या डब्यांमधुन टाकला जातो त्या डब्यांच्या कड्या तुटल्यामुळे नाईलास्तव ते डब्बे स्वच्छता दुतांना आपल्या डोक्यावर उचलुन घेऊन त्यातील कचरा घंटागाडीत टाकावा लागतो. त्यामुळे अनेकदा त्यातील आरोग्यास धोकादायक असलेला कचरा स्वच्छता दुतांच्या अंगावर पडत असल्याने स्वच्छता दुतांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट भयंकर वेगाने वाटचाल करत आहे. त्यामुळे शासनाने कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी अनेक निर्बंध देखील जाहीर केलेले आहेत. त्यातच जर शहरातील स्वच्छता दुत नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या हलगर्जीपणामुळे आजारी पडले तर शहरात हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही. कर्जत नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने सदर गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन कचरा संकलन करणार्‍या डब्यांची व्यवस्था करून स्वच्छता दुतांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version