श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरील धुपप्रतिबंधक बंधार्‍याची दुर्दशा

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धनच्या सुशोभीकरणात 14 कोटींचा धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. मात्र या बंधार्‍यांची अत्यंत दुर्दशा झालेली असून नगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणतेही डागडुजीचे काम सुरू केल्याचे दिसत नाही. समुद्रकिनार्‍यावर बांधण्यात आलेल्या बंधार्‍यावर पाणी जाण्यासाठी मोर्‍या बांधण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी असलेल्या पादचारी पुलावरील फळ्या पूर्णतः जीर्ण झालेल्या असून अपघात होण्याची शक्यता आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने बसवण्यात आलेल्या कचराकुंड्या अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेल्या आहेत. समुद्रकिनारी उतरण्यासाठी बसवलेल्या फरश्या समुद्राच्या पाण्याच्या जोरदार लाटांमुळे उद्धवस्त झालेल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रकिनारी बंधार्‍यावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील निसर्गचक्रीवादळापासून लुप्त झालेले दिसत आहेत. बंधार्‍यावर दहा स्टॉल उभारले आहेत. हे स्टॉल भाडेतत्त्वावर देण्यापूर्वीच त्यांची झालेली दुर्दशा झाली आहे. स्टॉल बनून देणार्‍या कंपनीकडून प्रत्येक स्टॉलमध्ये पंखे बसवण्यात आले होते. स्टॉलच्या शटरचे दरवाजे उघडून त्यातील पंखे देखील चोरीला गेल्याच दिसत आहे. मात्र याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version