| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन समुद्र किनार्यावर दिवसेंदिवस मोकाट श्वानांची संख्या वाढली असून, हे श्वान स्थानिकांसह पर्यटकांना त्रासदायक ठरत आहेत. काही महिन्यांपूर्वी समुद्र किनार्यावरील बंधार्यावर महिला पर्यटकाच्या अंगावर उडी घेत मोकाट श्वानांनी चावा घेतल्याची घटना घडली होती. तर, एका लहान मुलीच्या मागे श्वानांचे टोळकं लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेकडून अशा भटक्या श्वानांबाबतीत उपाययोजना करण्यात याव्यात, अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.
श्रीवर्धन समुद्र किनार्यावर पर्यटकांचा ओढा वाढू लागलाय. येणारा पर्यटक हा समुद्रकिनारी अथवा बंधार्यावर बसत जेवणखाण, नाश्ता उरकून झाल्यावर राहिलेले अन्न हे भूतदया दाखवीत तेथील मोकाट श्वानांना खाण्यास देतात. अनेकदा पर्यटक किनार्यावर खानपान करण्यासाठी बसतात तेव्हा भुकेल्या श्वानांची टोळकी पर्यटकांच्या अवतीभवती फिरताना दिसतात. श्वानांची पैदास दर सहा ते सात महिन्यांनी होत असल्यामुळे गेल्या दोन- तीन वर्षांत किनार्यावर असंख्य मोकाट श्वान भटकताना आढळतात. किनार्यावर व्यायामासाठी येणारे स्थानिक, विरंगुळा म्हणून फिरावयास येणारे ज्येष्ठ नागरिक व पर्यटक यांना सध्या श्रीवर्धन समुद्र किनारा हा मोकाट श्वानांमुळे असुरक्षित वाटू लागला आहे.
समुद्र किनार्यावरील अनधिकृत टपरीचालकांची संख्या वाढली असून, सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत सदरचे टपरी चालक व्यवसाय करताना दिसतात. टपरी चालक हे नाश्ता, चहा याबरोबरच पर्यटकांनी शाकाहारी, मांसाहारी जेवणाची ऑर्डर दिल्यास टपरी चालक जेवण ही तयार करून देतात. यावेळी यूज अॅन्ड थ्रो डिशमध्ये जेवण उरकल्यावर पर्यटक अन्नाची खरकटी डिश मिळेल त्या जागेवर टाकून देतात. टपरी चालक डिशेसची योग्य रीतीने विल्हेवाट लावत नसल्याने मोकाट श्वान राहिलेले अन्न खाण्यासाठी टोळक्याने येतात.अनेकदा हेच श्वान पादचार्यांच्या अंगावर जात असल्यामुळे अनधिकृत टपरी चालकांवर नगरपरिषदेकडून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.