| उरण | प्रतिनिधी |
उरण विधानसभा मतदारसंघातील शेवा-हनुमान कोळीवाडा परिसरातील मीरा रामकिसन परदेशी कुटुंबाच्या 16 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याच्या प्रयत्नाला अखेर प्रशासनाने नकार दिला आहे. शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष मंगेश अनंत कोळी यांनी दाखल केलेला अर्ज मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आविशकुमार सोनोने यांनी फेटाळून लावत सर्व संबंधित मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात मीरा रामकिसन परदेशी कुटुंबाच्या मतदारांची नावे वगळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मांगी कोळी यांच्यामार्फत प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान संबंधित मतदार हे नमूद पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. तसेच, त्यांची नावे याच मतदारसंघात कायम ठेवावीत, असा अहवाल बीएलओ यांनी सादर केला होता. या प्रकरणी दि.2 जून व 3 जून रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान संबंधित मतदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून आपली बाजू मांडली. त्यांनी आधारकार्डसह इतर कागदपत्रे सादर करत आपण उरण विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीतच वास्तव्यास असल्याचे स्पष्ट केले.







