| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल परिसरात गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी रस्त्यावर खोदलेले खड्डे गेल्या आठ दिवसांपासून तसेच ठेवण्यात आले आहेत. खोदलेल्या खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यात आली असली तरी त्यावर अद्याप डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही खडी संपूर्ण रस्त्यावर पसरली असून, वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. वाहनांच्या टायरखाली येणारी खडी वेगाने आजूबाजूला उडत असल्याने अनेक नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तसेच, काही वाहनांच्या काचाही फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या कामामध्ये डांबर उपलब्ध नाही, अशी माहिती मिळत आहे. मात्र, काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या वाहनांचे होणारे नुकसान व अपघातांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.







