शिक्षकांची बिंदुनामावली रखडली

200 शिक्षकांच्या नियुक्ती आदेशाचा युद्धपातळीवर शोध

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात प्राथमिक शाळांची जीर्णावस्था, रखडलेली डागडुजी, शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी रिक्त पदांचे असणारे ग्रहण आणि आता रखडलेली बिंदुनामावली यामुळे रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेला आता शिक्षक भरतीचे वेध लागले असलेतरी संचमान्यतेला झालेला उशीर आणि रोस्टर निर्मितीसाठी आवश्यक असणारे शिक्षक नियुक्तीचे आदेश सापडत नसल्याने शिक्षण विभागाला घाम फुटला आहे. शिक्षक नियुक्तीचे आदेशाअभावी रोस्टर रखडले तर त्याचा परिणाम आगामी शिक्षक भरतीवर होणार आहे. बिंदुनामावलीसाठीचे कागदपत्र सादर करण्याची डेडलाईन संपली आहे. वाढीव मुदत मागून कागदपत्र सादर करण्याचा शिक्षण विभागाने प्रयत्न सुरु केला असून, यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दप्तर शोधमोहीम सुरु केली आहे.

रायगड जिल्ह्यात मंजूर असणाऱ्या शिक्षकांची रिक्त पदे शैक्षणिक गुणवत्तेसाठी मारक ठरली आहेत. सुमारे 1500 शिक्षकांची रिक्त पदे असून, यापैकी होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये 80 टक्के शिक्षकांच्या जागा भरण्याची शक्यता आहे. पण, शिक्षक भरतीला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे 100 टक्के आधार प्रमाणीकरण नसल्याने संचमान्यता रखडली आहे. दुसरीकडे बिंदुनामावली अपूर्ण असल्यानेही प्रक्रिया लांबणार आहे. आता 7 जुलैपर्यंत बिंदुनामावलीची कार्यवाही पूर्ण करून माहिती मागासवर्गीय कक्षाला सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. शासनाने दिलेल्या मुदतीत बिंदुनामावली रजिस्टर कोकण भवन येथे सादर करण्यात आले. परंतु, या रजिस्टरमध्ये त्रुटी असल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बिंदुनामावलीला मंजुरी मिळालेली नाही.

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर बिंदुनामावली मान्यता मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सद्यःस्थितीत रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तालुकास्तरावरून शिक्षण विभागातील रोस्टरची माहिती संकलित केली. यामध्ये रोस्टर पूर्ण करण्यासाठीचे निकष पाळण्यात आले आहेत का, याची पडताळणी कर्णयसाठी कोकण भवन येथे बिंदुनामावलीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर या प्रस्तावात विविध जातनिहाय प्रवर्गातील सुमारे 200 शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश सापडत नसल्याची त्रुटी काढण्यात आली आहे. ही त्रुटी पूर्ण करत नाही तोपर्यंत बिंदुनामावलीला मान्यता मिळणे कठीण आहे.

शिक्षण विभागासमोर यक्षप्रश्न
कोकण भवन येथील समितीने काढलेल्या त्रुटीतील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीचा शिक्षण विभागासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कागदपत्र सादरीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शिवतीर्थावरील तिसऱ्या मजल्यावरील जुन्या कार्यालयात असणारी सर्व गाठोडे तपासून पाहण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये त्रुटीमधील कागदपत्र सापडले नाहीतर बिंदुनामावलीवरील निर्णयाचा चेंडू शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि शिक्षण विभागाच्या कोर्टात जाणार आहे.

बिंदुनामावलीचा प्रस्ताव कोकणभवन येथे सादर करण्यात आला होता. यामध्ये त्रुटी निघाल्याने हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात येणार आहे. अपेक्षित असणारी माहिती तालुकास्तरावरून संकलित करण्यात आली आहे. ती माहिती आणि कागदपत्रे एकत्रितपणे कोकणभवन येथे सादर काण्यात येणार आहेत. येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेमार्फत बिंदुनामावलीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे.

पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version