खाकी वर्दीतील माणुसकीने वृद्धेला दिला मायेचा आधार

। उरण । वार्ताहर ।
उरण पोलिसांनी खाकीतल्या देव माणसाची प्रतिची घडवून देत एका वृद्धेला मायेचा हात दिला. तालुक्यातील उरण तांडेल नगर येथे राहणार्‍या लक्ष्मी वसंत पोल या वृद्ध महिलेला पोटच्या मुलांनी मारहाण केली. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर बसणार्‍या या पीडित महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन कर्मचार्‍यांनी तिला मानसिक आधार दिला.

सध्या देशात जन्मदात्या आईवडिलांकडे लक्ष देण्यास स्वतःच्या मुलांना वेळ मिळत नसल्याने वृद्ध आईवडिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. उरण तांडेल नगर येथे राहणार्‍या लक्ष्मी पोल यांना स्वतः च्या मुलांनी मारहाण करण्याची घटना शुक्रवारी घडली. आपल्याला न्याय मिळावा या आशेने ही महिला उरण पोलीस ठाण्याच्या आवारात दोन तास बसून राहिली होती. पोलिसांनी याची दखल घेऊन त्या महिलेली विचारणा केली.त्यावेळी त्यांनी आपली व्यथा मांडली.
पोलीस कर्मचार्‍यांनी मायेचा हात देत या महिलेला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर बाकड्यावर बसवून पाणी, जेवण करणार का अशी विचारणा केली. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्याचे वचन दिले आहे. एकंदरीत, मुलांनी स्वतःच्या जन्मदात्या आईला फटकारले, मात्र उरण पोलिसांनी सावरले, अशी चर्चा तहसील कार्यालय व उरण पोलीस ठाण्यात ये-जा करणार्‍या नागरिकांनी व्यक्त केली.

या महिलेच्या मुलांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली आहे. मुलांनीही आपल्या आईचा सांभाळ करण्याचे कबूल केले असून, तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एल.के. मोरे, ठाणे अंमलदार, उरण पोलीस ठाणे



Exit mobile version