कर्जत मधील पोलीस निवासस्थाने मोडकळीस

। कर्जत । प्रतिनिधी ।
तत्कालीन गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी सहा वर्षांपूर्वी कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस वसाहतीची पाहणी केली होती. पोलिसांना स्वत:च्या मालकीची घरे देण्यासाठी प्रयत्न करणार असा शब्द दिला होता, मात्र या घटनेला सहा वर्षे झाली पोलीस कर्मचार्‍यांना मालकी निवासस्थाने तर सोडा जी शासकीय निवासस्थाने आहेत ती मोडकळीस आली आहे, त्याची दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली नाही.
कर्जत पोलीस ठाण्यात सुमारे 50-55 पोलीस कर्मचारी वर्ग आहे. कर्जतमध्ये पोलीस कर्मचार्‍यांसाठी पाच वसाहती आहेत. त्यापैकी दोन वसाहती या कर्जतच्या टेकडीवर आहेत, मात्र त्या वापरात नाहीत. तीन वसाहती या कर्जत पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला आहेत. त्यापैकी दोन वसाहती या ब्रिटीशकालीन आहेत. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेली वसाहत 1871 साली बांधण्यात आली आहे. त्या वसाहतीमध्ये 8 खोल्या आहेत. तर पोस्ट ऑफिस जवळ असलेली पोलीस वसाहत ही 1887 साली बांधण्यात आली आहे, त्याठीकाणी 6 खोल्या आहेत.
तिसरी वसाहत ही उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या मागे आहे. या इमारतीची काम 1984 साली करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये 13 खोल्या आहेत. मात्र या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे आता त्या इमारतीची अवस्था दयनीय आहे. या वसाहती समोर शासकीय इमारतीचे काम सुरू आहे त्या ठेकेदाराने पोलीस वसाहती समोर मातीचे मोठे ढिगारे करून ठेवले आहेत, पोलीस इमारतीमध्ये कसली सोय नसल्याने पोलीस कर्मचार्‍याला भाड्याची खोली घेवून राहावे लागत आहे. वसाहतीच्या दुरावस्थेमुळे पोलीस कर्मचा-यांचे हाल होत असून त्यांना भाड्याच्या खोलीत राहावे लागते आहे. त्यावेळी गृहराज्य मंत्री केसरकर म्हणाले ज्या वसाहती दुरुस्त करण्यासारख्या असतील त्या दुरुस्त करण्यात येतील मात्र पोलीस कर्मचार्‍यांना स्वत:च्या मालकीची घरे देण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे असे सांगितले होते, मात्र 6 वर्षात याबाबाबत कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे सध्या या इमारती दुरावस्थेत उभ्या आहेत.

Exit mobile version