। नाशिक । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असताना आता चौथ्या टप्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पुढील आठवड्यात राजकीय आखाडा तापणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आदींच्या सभा होत आहे. तर, महायुती व महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते मतदारसंघात तळ ठोकूण असणार आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची राळ उठणार आहे.
राज्यात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होत असून त्यासाठी शनिवारी (दि.11) प्रचारतोफा थंडावल्या आहेत. ही मतदान प्रक्रीया झाल्यानंतर, पाचव्या टप्यातील मतदारसंघाकडे राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पाचव्या टप्यात येत असून, पुढील आठवड्यात मंगळवारपासून (दि.14) राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे दुपारी 2.30 वाजता सभा घेणार आहेत. त्याचदिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिंडोरी तालुक्यातील वणी येथे सभा होईल. शरद पवार दोन दिवस नाशिकला तळ ठोकून असणार आहेत. 16 मे रोजी पवार यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे सभा होणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पवार यांची एकत्र सभा घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असून ती सभा सटाणा येथे होईल असे बोलले जात आहे. ही 16 मे रोजी ही सभा होण्याचा अंदाज आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळाचे नेते बाळासााहेब थोरात, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे नाशिकला दोन दिवस असणार आहेत.