राज्यात द्वेषाचे राजकारण चाललंय- छ. संभाजीराजे

| रोहा | प्रतिनिधी |

अवघ्या जगामध्ये सागरी किल्ले केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत. जलदुर्ग आणि गडदुर्गांनी रायगड जिल्हा समृद्ध आहे. या रायगड मध्ये सी-फोर्ट सर्किट टुरिझम करण्यात यावे. किल्ले रायगडाचे संवर्धन हे शास्त्रोक्त पद्धतीनेच केले जाईल. दुर्दैवाने आताचे राजकारण द्वेषापोटी चाललंय. मला राजकारणावर बोलायचे नाही परंतु हा आपला इतिहास नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास नाही, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी रोहा येथे केले. ज्येष्ठ गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

रायगड जिल्ह्यातील 59 किल्ल्यांची ओळख सांगणार्‍या ‘इये देशीचे दुर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. सुनिल तटकरे होते.

संभाजीराजे यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो, त्यांची शिकवण सांगतो, आपले चारशे वर्षांचे इतिहास पाहावे. सध्या जे द्वेषाचे राजकारण सुरू आहे ते यापूर्वी कधीही नव्हते. जे काही महाराष्ट्रात चाललं आहे ते आपले संस्कार आहेत का? मला राजकारणावर बोलायचे नव्हते परंतु मी प्रामाणिकपणे हे बोलतोय कारण आम्ही महाराजांचे संस्कार, त्यांची शिकवण घेऊन पुढे चाललो आहोत. असे सांगितले.

रोह्याची मुलगी किती परिवर्तन करू शकते हे वनश्री शेडगे हिने सातासमुद्रापार लंडनमध्ये दाखवून दिले आहे. छत्रपती शिवरायांचा तेथे केलेलं एकेरी उल्लेख हे वनश्रीला पहावले नाही. तिने ते बदलायला लावले. यासाठी मी वनश्रीचे मनापासून कौतुक करतो, असे छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.

आत्मचरित्र व हास्यकल्लोळ
यावेळी कोमसापचे प्रदीप ढवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे प्रकाशन ग्रंथाली करीत असल्याचे विश्‍वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी जाहीर केले. हा धागा पकडून खा. सुनिल तटकरे यांनी अध्यक्षीय भाषणात सदर विषय छेडताना आपण कोणाकोणाचे आत्मचरित्र करीत आहात. ते करताना त्यामध्ये सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गाने मुंबईचाही उल्लेख असावा, असे म्हटल्याने सभागृहात काहीवेळ हास्यकल्लोळ  माजले.

याप्रसंगी आ.अनिकेत तटकरे, कोमसापचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, ग्रंथाळी प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर, मराठी पत्रकार परिषदेचे मिलिंद अष्टीवकर, आर.आय.ए. अध्यक्ष पी. पी. बारदेशकर, मराठी भाषा समिती सदस्य रायगड मकरंद बारटक्के, उद्योजक विजयराव मोरे, गिर्‍यारोहक विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यात गडकोटांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या गडदुर्ग संस्थाचे यथोचित सन्मान यावेळी करण्यात आले. खा. सुनील तटकरे, प्रदीप ढवळ, सुदेश हिंगलासपूरकर, विवेक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले, लेखकाचे मनोगत सुखद राणे यांनी अतिशय भावनिक शब्दांत व्यक्त केले, त्यांनी सर्वप्रति व्यक्त होताना एस. एम. देशमुख यांनी सोशल मीडियावर प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने रायगड मधील  गडदुर्गांवर केलेल्या लेखनाबद्दल त्यांचे आभार मानले. मकरंद बारटके यांनी पुस्तकाचे परीक्षण जाहीर केले. सूत्रसंचालन विद्या घोडींदे यांनी तर आभार प्रदर्शन संध्या दिवकर यांनी केले, यावेळी जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने गडदुर्ग प्रेमी आणि रोह्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी सृष्टी फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version