उद्यापासून होणार पुन्हा मतदान केंद्राची पाहणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड लोकसभा मतदार संघातील मतदान येत्या (दि.7) मे ला होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा मतदान केंद्राची पाहणी केली जाणार आहे. मात्र काही मतदान केंद्र म्हणजे जिल्हा परिषद शाळांमधील वीज बील थकल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे मतदान केंद्रातील कर्मचारी व मतदारांची गैरसोय होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शनिवारपासून मतदान केंद्राची पाहणी करणारी समिती हा प्रश्‍न सोडविण्यास यशस्वी ठरतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष आठ लाख 13 हजार 515, महिला आठ लाख 40 हजार 416, तृतीय पंथी चार, दिव्यांग आठ हजार 46, 85 वयोगटापेक्षा 31 हजार 28 तर 18ते 19 वयोगटातील 16 हजार 288 मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 20 एप्रिल रोजी होणार आहे. अर्ज माघार घेण्याची प्रक्रीया (दि.22) एप्रिल त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघात दोन हजार 185 मतदान केंद्र आहेत. त्यात सहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मतदान सात मे रोजी होणार असून मतमोजणी चार जूनला होणार आहे. मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली होती.

मतदान येत्या (दि.7) मे ला आहे. त्यासाठी अवघे 15 दिवस शिल्लक आहेत. मतदान केंद्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसह मतदानासाठी येणार्‍या मतदारांना योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पथकामार्फत शेवटच्या टप्प्यातील पाहणी केली जाणार आहे. शनिवारपासून पथके जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्राला भेटी देणार आहे. मतदान केंद्रामध्ये वीज, पाणी व इतर सुविधा उपलब्ध आहेत, की नाही, याची पाहणी करणार आहेत. सुविधा उपलब्ध नसल्यास त्याठिकाणी तात्काळ सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या जाणार आहेत. अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील आठ जिल्हा परिषद शाळांमधील विज बील थकले आहे. महावितरण कंपनीने विज पुरवठा बंद केला आहे. या शाळा मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणीदेखील याठिकाणी नाही. मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी येणारे पथक मतदान केंद्रातील हे प्रश्‍न मार्गी लावण्यास यशस्वी ठरतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शनिवारपासून पुन्हा पथकांमार्फत मतदान केंद्राची अंतिम पाहणी होणार आहे. मतदान केंद्रात असलेल्या गैरसोयीची माहिती घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

संदेश शिर्के
निवासी उपजिल्हाधिकारी,
रायगड
Exit mobile version