विकासकामे किनाऱ्यासाठी ठरते घातक; ब्ल्यू फ्लॅग पायलट मानांकन प्राप्त
| श्रीवर्धन | समीर रिसबूड |
ब्ल्यू फ्लॅग पायलट मानांकन यामुळे श्रीवर्धन समुद्र किनारा जागतिक पर्यटन नकाशावर पोहोचणार आहे, ज्यामुळे स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळेल असा गवगवा करण्यात येत आहे. परंतु, सद्यस्थितीत श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या सुशोभिकरणातील बंधाऱ्याची लाटांनी दुरावस्था झाली आहे. आलेला पर्यटक बंधाऱ्यातील विखुरलेल्या दगडातून वाट शोधत किनाऱ्याकडे जातांना दिसतात.
श्रीवर्धन शहराला अडीच किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलाय, 2009 साली साधारण दीड किलोमीटर लांबीच्या अंतरावर धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला व बंधाऱ्यावर सुशोभिकरण करण्यात आले. 2009 सालापासून 2024 सालापर्यंत सुस्थितीत असलेला धुप प्रतिबंधक बंधारा या जीवनाबंदर व मुळगाव कोळीवाडा येथे सुरू असणाऱ्या विकासकामांचा दुष्परिणाम ठरू लागला आहे. सद्यस्थितीत बंधाऱ्यावरून किनाऱ्याकडे जाणारा रॅम्प व पायऱ्यांची अजस्त्र लाटांनी दुरावस्था झाली आहे.
जीवनाबंदर येथे सुरू असलेल्या अत्याधुनिक जेटीचे बांधकाम व मुळगाव कोळीवाडा येथील होत असलेला ग्रोयांन्स पद्धतीचा बंधारा, या विकासकामांसाठी एकरोवारी जागेत दगड व मातीचा भराव टाकण्यात येतोय. या भरावामुळे जीवनाबंदर येथील समुद्राच्या पाण्याने व मुळगाव कोळीवाडा येथील काळींजे खाडीच्या पाण्याने दिशा बदलली आहे. श्रीवर्धनची भौगोलिक रचना ही अशी आहे की, दोन डोंगरांच्यामध्ये शहर वसलेले आहे. भरावामुळे पाणी इतरस्त्र जात नसल्याने समुद्राच्या लाटा या अडीच किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर धडकत आहेत. या लाटांमुळे दीड किलोमीटर लांबीचा धुपप्रतिबंधक बंधारा उध्वस्त होत असून, बंधारा लगत असलेल्या रॅम्प व पायऱ्यांची दुरावस्था झाली आहे तसेच सुरूची झाडे ही लाटांमुळे भुईसपाट झाली आहेत.
संशोधनाचा विषय
समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यटकांचे संरक्षण तसेच निसर्ग व पर्यावरण रक्षण या अशा 33 निकषांमधून पास झालेल्यांना दर्जा दिला जातो. केंद्रीय पर्यावरण हवामान तसेच पर्यटन खात्याच्या संयुक्त उपक्रमांतर्गत मूल्यमापन करण्यात आल्यानंतर श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला 'ब्ल्यू फ्लॅग' दर्जा देण्यात आला आहे. वर्षभर पाहणी केल्यानंतर मानांकनाला अंतिम स्वरूप मिळणार आहे. 'ब्ल्यू फ्लॅग' मानांकनानंतर समुद्रकिनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उभारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळतो.
मानांकनाचा नक्की फायदा कोणाला?
श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला 'ब्लू फ्लॅग' मानांकन मिळाले आहे. यामुळे पर्यटनात मोठी वाढ अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्याने विदेशी पर्यटक येतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मात्र, या विकासाचा फायदा श्रीवर्धन येथील पर्यटन व्यवसायीकांना होणार की मुंबईकर व पुणेकर येथील धनिकांना, श्रीवर्धन येथे दिवसेंदिवस जमिन खरेदीचे व्यवहार वाढत असून स्थानिक पर्यटन व्यवसायीक बेरोजगार होत आहेत.







