। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील सुसंस्कृत आणि शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मेंदडीकोंड गावात रविवारी (दि.2) एक हृदयद्रावक घटना घडली. गावातील दोन सख्या भावांनी स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, परिसरात भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील महादेव कांबळे (95) आणि विठाबाई कांबळे (83) यांचा मृतदेह घरात आढळून आला. सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू असल्याची नोंद म्हसळा पोलिसांनी केली होती. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे आणि उपनिरीक्षक सुनिल कोहीणकर यांनी केलेल्या चतुरस्त्र तपासात संशय वाढला. यानंतर श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते येथील त्यांची मुलगी अर्चना भालचंद्र पाटील (40) हिने दिलेल्या तक्रारीवरून सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नरेश महादेव कांबळे (62) मजूर, चंद्रकांत महादेव कांबळे (60) निवृत्त कर्मचारी अशी अटक केल्या दोघांची नावे आहेत. म्हसळा पोलिसांनी केवळ 12 तासांत आरोपींना अटक करून तपास पूर्ण केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवतारे, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, आणि म्हसळा ठाण्याचे सपोनी रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





