। पनवेल । वार्ताहर ।
सायन-पनवेल महामार्गावरील खारघर येथील हिरानंदानी पुलाची दुरवस्था झालेली असून, पुलाच्या सळ्या उघड्या पडल्या आहेत. रस्त्यावर पडलेल्या खोल चिरेमुळे वाहनांचा वेग कमी करावा लागत आहे. वेग कमी होताच मागून येणार्या वाहनाच्या धडकेमुळे किरकोळ अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
सायन-पनवेल महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हिरानंदानी पुलावर डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र, डांबरीकरणाचे काम करताना पुलाच्या मध्यभागी बीमलगत योग्यप्रकारे डांबरीकरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे लोखंडी पट्ट्या उघड्या पडल्याचे दिसून येत आहे. तसेच, जड वाहतुकीमुळे पुलाला मोठे हादरे बसतात. त्यातच रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यामुळे वाहनांचा वेग कमी होताच पाठीमागून येणार्या वाहनाच्या धडकेमुळे किरकोळ अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे लहान वाहने व दुचाकींचे मोठे नुकसान होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डेदुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.