। पनवेल । वार्ताहर ।
शाळेला सुट्टी पडल्यामुळे सकाळ-संध्याकाळ विविध खेळ खेळण्यासाठी मुले मैदानाकडे धाव घेत आहेत; मात्र, तळोजा सेक्टर-10 मधील मैदानातील खेळणी मोडकळीस आली आहेत. मैदानाभोवती लावण्यात आलेली लोखंडी जाळी गायब झाली असून, मैदानाला लागून असलेल्या वीजपेटी, ट्रान्स्फॉर्मर उघड्या अवस्थेत असल्यामुळे मुलांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर मैदानाची दुरूस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
सिडकोने तळोजा सेक्टर-10 येथील भूखंडावर खेळाचे मैदान विकसित केले आहे. परिसरात हे एकमेव मोठे मैदान आहे. सध्या शाळेला सुट्टी पडल्यामुळे विविध खेळ खेळण्यासाठी परिसरातील मुलांची मैदानात गर्दी असते. मात्र, मैदानातील सर्व खेळणी मोडकळीस आली असून मैदानात कचरा साचला आहे. सिडकोने उभारलेले सर्व पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे काही तरुण रात्रीच्या वेळी अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात आहे. या मैदानाभोवती लावण्यात आलेली लोखंडी जाळी गायब झाली आहे. तसेच, मैदानालाच लागून असलेल्या वीजपेट्या आणि विद्युत रोहित्र उघड्या अवस्थेत असल्यामुळे मुलांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.