तळा शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीची दुरवस्था
| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली असून, मरणानंतरही याठिकाणी प्रेताला यातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
तळा शहरातील कुंभार समाज स्मशानभूमीशेजारी असलेली सार्वजनिक स्मशानभूमी आठ गुंठे जागेत विस्तारलेली असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र अर्ध्या गुंठ्यातच ही स्मशानभूमी असल्याचे दिसून येते. तळा ग्रामपंचायत असताना उभारण्यात आलेली ही स्मशानभूमी तळा नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरही त्याच अवस्थेत आहे. शहरात प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी असल्याने ज्यांना स्मशानभूमी नाही असे नागरिक अंत्यविधीसाठी सार्वजनिक स्मशानभूमीचा वापर करतात. परंतु, या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाकडून प्रेत जाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळे अचानक एखाद्याचा मृत्यू झाल्यास ते प्रेत जाळण्यासाठी साधन सामुग्री उपलब्ध करताना नातेवाईकांची तारांबळ उडते.
या स्मशानभूमीच्या आजूबाजूला गवत वाढलेले असून, अंत्यसंस्कार करण्यात येणार्या जागेवर साधी शेडदेखील उभारण्यात आलेली नाही. यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना भरउन्हात अंत्यविधी उरकावा लागतो. तसेच हीच परिस्थिती पावसाळ्यात राहिली तर भरपावसात अंत्यविधी करणे शक्य होणार नाही, त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे प्राधान्याने लक्ष देऊन सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.