। तळा । वार्ताहर ।
ग्रामीण भागात आजही अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची समस्या गंभीर असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी उभारण्याचे काम करण्यात येते मात्र अनेकदा निधी अभावी तर काही गावांमध्ये जागे अभावी स्मशानभूमी उभारणीत अडचणी येत असतात. दरम्यान उभ्या असलेल्या स्मशानभूमींच्या देखभाल दुरुस्ती अभावी अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असल्याचेही दिसून येत आहे. तालुक्यातील कुडे गावातील कुंभार समाजाच्या स्मशानभूमीला शेड टाकण्याच्या मागणीला जोर वाढताना दिसून येत आहे.
कुंभार समाजाच्या कुडे येथील स्मशानभूमीला आजपर्यंत शेड न टाकल्याने पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात जोराचा पाऊस पड़त असेल तर त्यावेळी एखाद्याचे निधन झाले तर त्याठिकाणी मृतदेह ठेवणे अथवा जळीत करणे ही मोठी समस्या निर्माण होते. त्यावेळी पाऊस थांबण्याची वाट पहावी लागते.पाऊस थांबलाच नाही तर मोठी समस्या निर्माण होते अशा घटनांना अनेक वेळा या समाजाला सामोरेही जावे लागले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कुंभार समाजाच्या स्मशानभूमीवर त्वरीत शेड टाकण्यात यावी अशी मागणी नागरीकांतून होताना दिसत आहे.