। तळा । प्रतिनिधी ।
तळा शहरातील रोहिदास समाज स्मशानशेडची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या स्मशानशेडची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तरीदेखील प्रशासनाकडून याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तळा तळेगाव रस्त्यावरील उजव्या बाजूला असलेल्या रोहिदास समाज स्मशान शेडचे पत्रे पूर्णतः वाकलेल्या अवस्थेत आहे. तसेच, काही ठिकाणी पत्र्याचा भाग विखुरला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी शेड असूनदेखील अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात उभे राहून अंत्यविधी करावा लागत आहे. दरम्यान, या स्मशानभूमी दुरुस्तीसाठी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या गोष्टीला बर्याच महिन्यांचा कालावधी उलटला असताना देखील अद्यापही स्मशानभूमीची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. काही महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला असून स्मशान शेडच्या दुरावस्थेमुळे पावसाचे सर्व पाणी स्मशानाच्या आत पडणार आहे. अशावेळी गावात एखादी दुःखद घटना घडल्यास येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे या स्मशान शेडची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.