। चिरनेर । प्रतिनिधी ।
यभात पिके तयार होण्याच्या अखेरच्या वेळेला दररोज सायंकाळी परतीच्या पावसाने बरसायला सुरुवात केल्याने पिके संकटात सापडली आहेत. या संकटात सापडलेल्या भात पिकांकडे आता जंगली रानडुकरांची वक्रदृष्टी असल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. उरण परिसरातील भातशेती कापणीला आली असताना शेतात रानडुकरांचा हैदोस सुरू झाला असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास कळपाने पिकांवर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, आवरे, साई, दिघाटी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
यंदा लावणीसाठी पाऊस उत्तम झाला. मात्र, यानंतर पिके तयार होण्याच्या वेळेला आणि भात कापणीच्या हंगामात परतीच्या पावसाने रंग दाखवायला सुरुवात केल्याने येथील शेतीवर संकट आले आहे. ऐन कापणीच्या मोसमात पाऊस दररोज सायंकाळी हजेरी लावत असल्यामुळे तयार भात पिके घरीआणायची तरी कशी? हा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत असून, शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यातच रानडुकरांचे संकट उभे ठाकले आहे. या पिकलेल्या शेतीची नासाडी करण्यासाठी येणार्या रानडुकरांना पळवून लावण्यासाठी शेतकर्यांना रात्रभर शेताची राखण करावी लागत आहे. भात पिकांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या प्रतिकारात रांडुक्कर मेल्यास शेतकर्याविरुद्ध शिकारीचा गुन्हा दाखल होत असल्याने कोणीही असा प्रतिकार अथवा बंदोबस्त करण्याच्या मनस्थिती दिसून येत नाही. परिणामी शेतकर्यांच्या शेताची नासधूस होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.