| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरीत हवामानाचा खेळ पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. एकीकडे कडक उन्हाने तापमान 37 अंशांवर पोहोचले, तर दुसरीकडे अवेळी पावसाने हापूस आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान सुरू केले आहे. कधी डझनाला 1500 ते 2000 रुपयांना विकला जाणारा हापूस आंबा आता थेट 300 ते 400 रुपयांपर्यंत घसरला आहे. बाजारात आवक वाढली, पण दर मात्र कोसळले. यामुळे उत्पादकांना अक्षरशः तोट्यात माल विकण्याची वेळ आली आहे.
दिवसेंदिवस हापुसच्या दराची घसरण सुरुच आहे. स्थानिक बाजार पेठेत हापूसची आवक देखील चांगलीच वाढली आहे. बदलत्या हवामानामुळे व पावसामुळे आता आंबा व्यावसायिकांना हे दर पाडून विकण्याची वेळ आली आहे. मात्र, हापूस आंबा खाणाऱ्यांना कमी झालेल्या दरामुळे हापूसची चव चाखने सोपे झाले आहे. हापुसचे दर आवाक्यात आल्याने लोकांनी हापूस आंबा खरेदीसाठी जिल्ह्याच्या स्थानिक बाजार पेठेत गर्दी केलेली पहावयास मिळत आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे तयार फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. आता नाही तर कधीच नाही तातडीची काढणी गरजेची झाली आहे. तयार हापूस आणि काजू तात्काळ काढून घ्यावा. नूतन झेल्याचा वापर करून फळे सुरक्षितरीत्या तोडा. काढलेली फळे उन्हात न ठेवता झाकलेल्या ठिकाणी हलवा. काढणी सकाळी 10 पूर्वी किंवा संध्याकाळी 4 नंतरच करा, असा स्पष्ट इशारा कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
रत्नागिरीच्या बाजारात हापूसचा दर कोसळला
