| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण शहरातील स्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शहरातील वार्ड क्रमांक 7 मधील सार्वजनिक स्वच्छतागृह, गटारे आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे रोगराईची शक्यता बळावली आहे आहे. या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना न केल्यास शुक्रवारी (दि.29) रोजी शहरातील साचलेला कचरा उरण नगरपरिषदेच्या प्रशासन भवनासमोरच टाकण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी मंगळवारी (दि.26) उरण नगरपरिषदेला दिला आहे.
उरण शहरातील कोटनाका वार्ड क्रमांक 7 हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. या वार्ड मध्येच असलेल्या मासळी मार्केट, भाजी मार्केट आणि इतर विविध दुकाने आहेत. या ठिकाणी दररोज उरण परिसरातील दररोज हजारो नागरिक खरेदी विक्रीसाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी नागरिकांसाठी असलेल्या सोयी सुविधा अत्यंत अपुऱ्याच आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह आणि परिसरात स्वच्छतेअभावी कायम अस्वच्छता पसरलेली असते. मासळी, चिकण, मटणाची दुकाने, भाजी मार्केट व इतर दुकानांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साठतो. सातत्याने तुंबलेल्या गटारांमुळे घाणपाणी थेट रस्त्यावर पसरते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. परिसरातील पसरणाऱ्या घाणीच्या साम्राज्यामुळे उंदीर, घुशींचा वावरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.उरण नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभारामुळे मात्र परिसरात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो व इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, नागरिकांनी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.26) नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन सादर केले. तसेच, येथील समस्या दोन दिवसांत कायमची सोडविण्यात यावी. अन्यथा शुक्रवारी शहरातील साचलेला कचरा उरण नगरपरिषदेच्या प्रशासन भवनासमोरच टाकण्यात येईल, असा इशारा नरेश रहाळकर यांनी दिला आहे.
उरणमधील स्वच्छतेची समस्या गंभीर
