निवडणुकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता


। अलिबाग । प्रतिनिधी ।

निवडणूकीच्या कामासह मतदानावर बहिष्कार न टाकण्याचे आवाहन करीत आचारसंहिता संपल्यावर प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्‍वासन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. एसटी कर्मचार्‍यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर कर्मचारी मतदानावर बहिष्कार टाकणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

एसटी महामंडळ रायगड विभागात तीन हजारहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. त्यामध्ये दीड हजारहून अधिक चालक व वाहकांची संख्या आहे. आपत्कालीन परिस्थितीत रात्रीची दिवस करीत एसटी कर्मचार्‍यांनी प्रवाशांना सेवा दिली आहे. निवडणूकीच्या काळात कर्मचार्‍यांसह मतपेट्यांची ने-आण करणे. कोरोना काळात परराज्यातील कर्मचार्‍यांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहचविण्याची कामगिरी प्रामाणिकपणे बजावली आहे.

रायगड जिल्ह्यात दिवसाला एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करीत असून सुमारे 35 लाखाहून अधिक एसटीला उत्पन्न मिळवून देण्याचे काम केले जाते. उत्पन्न वाढीसाठी एसटी कर्मचारी काम करतात. तरीदेखील हे कर्मचारी उपेक्षित राहिले असल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केल आहे. वेतन वाढीसह सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून एसटी कर्मचारी लढा देत आहेत. गेल्या दहा वर्षापासून कामबंद आंदोलन, संप, मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरकारकडून फक्त आश्‍वासने देण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीदेखील आश्‍वासन दिले होते. परंतु त्या आश्‍वासनाची पुर्तता करण्यास सरकार उदासीन ठरल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या निवडणूक प्रक्रीयेत तसेच मतदानावरही बहीष्कार टाकण्याचा निर्णय कर्मचार्‍यांनी घेतला होता. निवडणूक प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पुढाकार घेत त्यांच्या दालनात मंगळवारी एसटी कर्मचार्‍यांना बोलावण्यात आले. यावेळी त्यांचे गार्‍हाणे ऐकून घेतले. निवडणूकीच्या काळात कोणतेही आश्‍वासन देता येत नाही. मात्र निवडणूक प्रक्रीया पुर्ण झाल्यावर आचारसंहिता संपल्यावर तातडीने हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. वरिष्ठ पातळीवर याबाबत सांगून प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले. या सकारात्मक चर्चेनंतर कर्मचारी बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एसटी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा दिला जात आहे. सरकारकडून फक्त आश्‍वासने दिली जात आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे निवडणूकीच्या कामासोबत मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हाधिकारी यांच्या समवेत सकारात्मक बैठक झाली. आचारसंहिता संपल्यावर तातडीने प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्याचा प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले आहे.

प्रसन्न पाटील- सचिव,
शिवशक्ती युनियन, एस कर्मचारी
Exit mobile version