| दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील मासे विक्री करणार्या महिलांना व्यवसाय करण्यास मच्छीमार्केटची सुविधा नाही. सातत्याने मागणी होत असताना रस्त्यावर विक्री करत जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. या महिलांच्या हाकेला कुणीच प्रतिसाद देत नसल्याने अखेर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधी दिघी ग्रामपंचायतीला महिलांच्या संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे.
दिघी किनारपट्टीवर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असला तरी सुविधायुक्त मासे विक्री मार्केटची मात्र, कमी आहे. येथील आई एकवीरा ओली सुकी मच्छी विक्रेता ही महिलांची सामाजिक संस्था असून, या संस्थेतील दोनशेहून अधिक महिलांचा मासेमारी प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायावर आपला कुटुंब चालविणार्या महिलांना मासे विकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नेहमीच महामार्गालगत वाहनांच्या वर्दळीत बसून जीव धोक्यात घालावा लागत आहे.
दिघी येथे औद्योगिक क्षेत्र तसेच पर्यटन स्थळ म्हणून वाढता आवाका आहे. याठिकाणी सुसज्ज मच्छीमार्केटची सुविधा मिळावी यासाठी स्थानिक संस्थेच्या हद्दीतील मेरिटाईम बोर्ड, दिघी पोर्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या परवानगीने जागा उपलब्ध होऊन रोजगाराची समस्या सुटावी यासाठी ग्रामपंचायतकडे या संस्थेकडून मागणी करण्यात आली. मात्र, महिला सक्षम व आर्थिक संपन्न होण्याच्या वेळोवेळी घोषणा करणार्या प्रशासनाने या मागणीकडे अद्याप दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे येथील महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा तसेच लोकसभा या सर्वच निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.