पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

| पाली | वार्ताहर |

अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नाताळच्या सुट्टीनिमित्त रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. लाखोंच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल झाली असल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

नाताळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी थेट जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहील. कारण, नाताळच्या सुट्ट्या, नववर्षाचे स्वागत, विविध सहली आणि 13 फेब्रुवारीला असलेला माघी गणेशोत्सव यामुळे आगामी दीड महिना पालीत भाविकांची प्रचंड गर्दी राहणार आहे. भाविकांची मोठी गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदादेखील तेजीत आहे. पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षारक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाक्यावर पोलीस तैनात असूनदेखील अरुंद रस्ते, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतूक आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैधरित्या उभ्या केलेल्या वाहनांमुळे पोलिसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षकदेखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत. मात्र, त्यांना सर्वच ठिकाणची कोंडी सोडवणे शक्य होत नाही.

बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये भोजन उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक भक्त निवास आहेत. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंगदेखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.

जितेंद्र गद्रे, अध्यक्ष,
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

नाताळच्या सुट्ट्या आल्याने आता मोठ्या प्रमाणात भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत. भाविकांची खूप गर्दी असल्याने व्यवसायदेखील चांगला होत आहे. पुढील काही दिवस अशीच गर्दी राहील.

मनोज मोरे, व्यावसायिक
Exit mobile version