पाणी टंचाईची समस्या गडद

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा; प्रशासनासमोर पाणीनियोजनाचे आव्हान

| रायगड | प्रमोद जाधव |

दिर्घ प्रतिक्षेनंतर जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळला तरी धरणे, तलाव, नदी, विहीरी पाण्याने तुडूंब भरल्या. त्यामुळे लघुपाट बंधारे विभागाच्या धरणांमध्ये 91.28 टक्के जलसाठाअसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सप्टेंबरपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्यामुळे धरणांमधील जलसाठा हळूहळू कमी झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे. गतवर्षी याच कालावधीत 16 धरणे पाण्याने शंभर टक्के भरली होती. यंदा मात्र आतापर्यंत 15 धरणांमध्ये 95 ते 99 टक्के जलसाठा आहे. त्यात 3 धरणांमध्ये 99 टक्के, तर 6 धरणांमध्ये 96 टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा धरणांमध्ये जलसाठा कमी आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची भिती निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला होता. जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने धरणेही पाण्याने फुल्ल झाली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दूसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 16 धरणांमध्ये शंभर टक्के, 3 धरणांमध्ये 50 ते 64 टक्के, उर्वरित 3 धरणांमध्ये 36 ते 40 टक्के आणि 4 धरणांमध्ये 3 ते 25 टक्के, तर एका धरणांमध्ये 82 टक्के जलसाठा होता. मात्र, यंदा जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. जूलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस चांगला पडला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाची रिपरिप चालू होती. त्यामध्ये जिल्ह्यातील लघू पाटबंधारे विभागाची 28 धरणे पाण्याने भरली. मात्र, सप्टेंबरपासून पावसाने खेळखंडोबा सुरु केला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवू लागले. उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 91 टक्के जलसाठा असला, तरी गतवर्षीच्या तुलनेने यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा कमी असल्याचे टक्केवारीनुसार दिसून येत आहे. यंदा 3 धरणांमध्ये 99 टक्के, 6 धरणांमध्ये 96 टक्के, अन्य 3 धरणांमध्ये 97 टक्के इतका जलसाठा आहे. उर्वरित धरणांमध्ये 95 टक्क्यांपासून खाली जलसाठा असून, 3 धरणांमध्ये 50 टक्केच पाण्याचा साठा असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील काही गावे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, एमआयडीसीच्या पाण्यासाठीदेखील दोन ते तीन दिवसांची प्रतिक्षा नागरिकांना करावी लागत आहे. जिल्ह्यामध्ये लघुपाट बंधारे विभागाच्या अखत्यारित 28 धरणे आहेत. या धरणांद्वारे लाखो नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. रायगडसह नवी मुंबई व इतर जिल्ह्यातील गावांना पाणी पुरवठा जिल्ह्यातील धरणांमधून केला जात आहे. परंतु, यंदा पाऊस लवकर गायब झाल्याने पाण्याचा प्रश्न आतापासून भेडसावू लागला आहे. अनेक गावांना चार ते आठ दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने आगामी काळात पाण्याचा दुष्काळ वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.

जलजीवन योजना फेल ?
प्रति माणसी 55 लिटर पाणी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन योजना राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पाण्याचे स्त्रोत निर्माण करून नळाद्वारे घरापर्यंत पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, महिलांच्या डोक्यावरून हंडा उतरविण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये हाती घेतलेल्या 1 हजार 496 योजनांपैकी 613 योजनांची कामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित कामे अजूनही प्रगती पथावर आहेत. काही कामे 25 टक्क्यांपर्यंतच झाली आहेत. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचे काम आता निधी अभावी ठप्प झाले आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. योजना राबवून जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्यांमधील घरांत पाणी पोहचलेच नाही. नळ कनेक्शन देण्यात आले; परंतु, त्या नळांमध्ये पाणी नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यात काही भागांमध्ये आहे. त्यामुळे ही योजना जिल्ह्यात फेल ठरल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या पाणी मुबलक आहे. परंतु, पावसाअभावी पाण्याची समस्या भेडसावणार आहे. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याची सुरुवात करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाणी देण्यावर अधिक भर दिला आहे. प्रत्येकाने पाणी जपून वापरावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. थकीत बिलांमुळे ग्रामपंचायतीमधील एमआयडीसीद्वारे होणारा पाणी पुरवठा खंडीत होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कार्यवाही केली जाईल.

भरत गोगावले,
पालकमंत्री, रायगड
Exit mobile version