‘यशवंती खार’ शेतकर्‍यांची समस्या सुटणार

नवीन दरवाजे रोखणार पाणी
सात उघडीसाठी 18 लाखांचा निधी

| दिघी | वार्ताहर |
तालुक्यातील शिस्ते-दिवेआगर मार्गावरील यशवंती खारभूमीलगत असणार्‍या खाडीचे दरवाजे दर पावसाळी तुटत असतात. यामुळे गेली कित्येक वर्षे तयार भातपिकांना जबरदस्त फटका बसायचा. कापून ठेवलेल्या पिकांची दैनाच उडायची आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जायचा. मात्र, या समस्येतून आता शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. याठिकाणी नव्याने फायबर दरवाजे बसणार असून, त्यासाठी 18 लाखांचा मंजूर झाला आहे.

दिवेआगर खाडीलगत बोर्लीपंचतन परिसरातील चार ते पाच गावांतील अनेक शेतकर्‍यांची अंदाजे 400 हेक्टर क्षेत्रात खारशेती जमीन आहे. त्यात शेतकरी दरवर्षी भातशेतीचे उत्पन्न घेतात. समुद्राच्या खाडीतून शेतात समुद्राचे पाणी जाऊ नये यासाठी भक्कम दरवाजे असलेली ‘सात उघडी’ आहे. मात्र, मागील चार वर्षांत उधाणाच्या भरतीत होत असलेली मासेमारी दरवाजे उद्ध्वस्त होणार्‍या कारणाने शेतकर्‍यांची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली जायची.

या समस्येवर गेली चार वर्षे कोणताच तोडगा निघत नव्हता. कारण खाडीचे अचानक होणारे नुकसान, यावर दुरुस्तीसाठी राखीव निधी उपलब्ध नसतो. तसे सुरुवातीला मागणीनुसार प्रस्तावित टेंडर निघून कामे केली जातात. मात्र, अचानक होणार्‍या नुकसानीने देखभाल, दुरुस्तीला स्वतंत्र निधी उपलब्ध होत असे प्रत्येक वेळा सबंधित अधिकार्‍यांकडून सांगण्यात यायचे. त्यामुळे दरवेळेला शेतकर्‍यांच्या पिकलेल्या भातावर पाणी फिरायचे.

शेतकर्‍यांच्या या समस्येबाबत लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार वृत्त पत्रातून समस्या मांडण्यात आली. यातून खारभूमी सर्व्हेक्षण व अन्वेक्षण विभागाचे शेतकर्‍यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे यावर्षी यशवंती खारभूमीलगत असणार्‍या खाडीचे दरवाजे बसवण्यात येणार आहेत. जलसंपदा विभाग अंतर्गत खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण यांनी 18 लाख 696 निधी मंजुरी कामाला सुरुवात झाली असून, कित्येक वर्षांनी समस्या सुटल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

लाकडी दरवाजे टिकाव धरत नसल्याने मागणीनुसार नवीन प्रस्ताव देण्यात आला आणि तो मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली आहे. या महिन्यात दरवाजे काम पूर्ण होईल. – स्वप्नील पिसे, उपविभागीय अभियंता ( खारभूमी सर्व्हेक्षण व अन्वेक्षण विभाग श्रीवर्धन )

Exit mobile version