पोश्री नदीत तरुण वाहून गेला
नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कळंब गावाच्या बाहेरून वाहणार्या पोश्री नदीच्या पाण्यात रविवारी 18 जुलै रोजी एक 26वर्षीय तरुण वाहून गेला आहे.तीन मित्रांसह पोश्री नदीवरील कळंब पुलाच्या बाजूला असलेल्या गणेश घाटावर नदीचे पाणी पाहण्यासाठी ते तरुण देवपाडा गावातून दुचाकीवर बसून आले होते.दरम्यान,त्या तरुणाचा शोध रात्री पासून सुरू असून 15 किलोमीटर परिसरात पोश्री आणि उल्हासनदीच्या कडेला असंख्य ग्रामस्थ आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस यांच्याकडून शोध मोहीम सुरू आहे.
प्रमोद जगन जोशी हा अन्य दोन मित्रांसह सायंकाळी सहा वाजता देवपाडा गावातून दुचाकीवर निघाले होते. रंगरंगोटीचा ठेका घेणारे हे तरुण पोश्री नदीला किती पाणी आले आहे हे पाहण्यासाठी देवपाडा येथून वारे मार्गे कळंब येथील पुलावर आले. पुलाच्या बाजूला असलेल्या गणेश घाटावर बसून नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पाय टाकून ते तीन तरुण महापुराचे पाणी न्याहाळत होते. त्या भागात पोश्री नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर खडकाळ भाग असल्याने गणेश घाटासमोरून वाहणारे पाणी जोरजोरात आवाज करीत वाहत असते. त्यावेळी त्या तीन तरुणांमध्ये नदी पार करण्याची पैज लागली. मग प्रमोद आणि आणखी एका तरुणाने काठोकाठ वाहत असलेल्या पोश्री नदीमध्ये उड्या मारल्या,त्यात प्रमोद हा नदीचा पलीकडील तिर गाठू शकला नाही.पलीकडे तीरावर पोहचलेल्या दुसर्या तरुणाने प्रमोदचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,मात्र अंधार पडू लागल्याने ते दोन तरुण बाईक घेऊन देवपाडा गावात पोहचले आणि घडलेली घटना सांगितली.
यानंतर पोशिर,पोही,वारे, कळंब गावातील लोक पोश्री नदीवर पोहचले.मात्र अंधार झाल्याने प्रमोद जगन जोशी या तरुणाचा शोध लागला नाही.आज 19जुलै रोजी सकाळी नेरळ पोलिसांच्या मदतीला आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ यांनी कळंब पुलापासून मानिवली पर्यन्त आणि तेथून पुढे उल्हासनदीच्या तीरावर पाषाणे पुलापर्यंत माले, कळंब, पोही, पोशिर,मानिवली,पिंपळोली,देवपाडा, फराटंपाडा,खाडेपाडा गावातील तरुण आणि ग्रामस्थ हे शोध कार्य करीत होते.तर नेरळ पोलीस ठाण्याचे कळंब आउटपोस्टचे उपनिरीक्षक केतन सांगळे,पोलीस नाईक माने,राठोड यांच्यासह विशाल तुपे,संतोष गवळी,प्रवीण शिंगटे,लक्ष्मण शिनारे,मणेश राणे,निवृत्ती झोमटे,समीर राणे,प्रवीण तुपे,प्रल्हाद डायरे,शिवा सोनावले,जयेश भोपी,प्रवीण तुपे,अश्विन तुपे,शांताराम कदम,रमेश तुपे,गणेश विरले आदींसह असंख्य स्थानिक तरुण पोलिसांच्या सोबतीला आहेत.शेकडो स्थानिक ग्रामस्थ प्रमोद जगन जोशी या तरुणाचा शोध घेत आहेत.