जीवघेण्या अपघाताचा धोका, एमएसआरडीसीचेे दुर्लक्ष
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
जुलै महिन्यात अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे वाकण पाली मार्गावरील अंबा नदीच्या पुलावरून सातत्याने पाणी गेले. यामुळे पाली व जांभूळपाडा पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे.
मात्र एमएसआरडीसीने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आता पूल आणखी धोकादायक झाला आहे.त्यामुळे या मार्गावर जीवघेण्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पुलावरील सद्यस्थितीत होत असलेली अवजड वाहतूक देखील धोकादायक व जीवघेणी ठरत आहे. आंबा नदीवरील हा पुल मुंबई गोवा महामार्ग व मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला जोडतो. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतुक होते. आता या पुलाजवळ ठिकठिकाणी खड्डे सुद्धा पडले आहेत. लोखंडी रेलिंग व सिमेंटचे कठडे देखील तुटले आहेत. साधारणपणे पाऊस सुरू झाल्यावर काही दिवसांनी पुलावरील संरक्षक कठडे (लोखंडी रेलिंग) एमएसआरडीसी कडून काढले जातात. या आधी ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढले जायचे. मात्र हे कठडे लावणे व काढणे याकडे दुर्लक्ष होत आहे.
पुलावरील कमकुवत संरक्षक कठडे,मोठे खड्डे,क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची ये-जा, वारंवार पुलावर वाहून येवून साठलेला राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पुल अत्यंत धोकादायक झाला आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तर पुलावरील असले नसलेले संरक्षक कठडे देखील वाहून गेले आहेत. त्यामुळे पूल अधिकच धोकादायक झाला आहे. यापूर्वी अनेकदा एमएसआरडीसी माती भरलेले लोखंडी डब्बे व त्यावरील काठ्या उभ्या करून रिफ्लेक्टर पट्ट्या लावून तात्पुरता उपाय करीत आली आहे, मात्र सद्यस्थितीत संरक्षण कठडे नसल्याने मृत्यूमुख उघडे आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे, यापूर्वी वाहने नदीत कोसळून अपघात घडले आहेत. दरम्यान पाली व जांभूळपाडा नवीन पुलाचे काम सुरू आहे मात्र अत्यंत संथ व धीम्या गतीने काम सुरू असल्याने पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करून वाहतूक सुरू करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.