| पेण | वार्ताहर |
रमेश महादू पाटील व रंजना रमेश पाटील यांच्या घरावर सरपंच लहू पाटील यांनी 30 जुलै 2021 रोजी नियमबाह्य कारवाई करून घरासमोरील संरक्षण भिंत तोडली होती. त्यानंतर पुन्हा पदाचा दुरुपयोग करून 13 ऑगस्टला रमेश पाटील यांना नोटीसीद्वारे कळविले होते, की 15 दिवसांच्या आत इतर ही बांधकाम तोडून टाकणार आणि झालेला खर्च वसूल केला जाईल.
यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 52 (2) नुसार कारवाई करणार असल्याचे नमूद केले होते. मात्र, या कलमानुसार कोठेही सरपंचाच्या अधिकारात अनधिकृत बांधकाम असल्यास ते काढण्याचे तरतूद नाही. असे असतानादेखील सरपंच मनमानी करत असल्याने रमेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडे न्यायासाठी धाव घेतली. दिलेल्या माहितीच्या आधारे स्थायी समितीने 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधि नियम क्रमांक 3) चे कलम 142 नुसार अपिल स्थगितीचे आदेश दिले आहेत. जो पर्यत सदरील चौकशी पुर्ण होत नाही तो पर्यत सरपंचानी दिलेल्या नोटीसीला स्थगिती दिली आहे. अशा प्रकारचा पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या सहीने ग्रुप ग्रामपंचायत सापोलीचे सरपंच व गटविकास अधिकारी पेण यांना दिले आहे. या स्थगितीमुळे सरपंचाच्या मनमानी कारभाराला खीळ बसली आहे.
या विषय गटविकास अधिकारी एम.एन. गढरी यांना भ्रमणध्वनीवरुन विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की जिल्हा परिषदेकडून आलेली नोटीस ग्रामसेवकाकडून बजावली असून, सरपंचांची पोहोचदेखील घेतली आहे.