। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धंन विधानसभा मतदारसंघातील जनता घराणेशाहीला कंटाळली आहे. त्यांना आता परिवर्तन पाहिजे आहे आणि आता जनतेला नवगणे रुपी पर्याय देखील मिळाला आहे. यावेळी मतदारसंघाचा आढावा घेताना एक लक्षात आले की या मतदारसंघातील सर्व समाज घटकांचा पाठिंबा महाविकास आघाडीला आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांनी केल आहे.
श्रीवर्धन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ उमेदवार कार्यालयाचे उद्घाटन अनिल नवगणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नवगणे यांनी तटकरे कुटुंबीयावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, श्रीवर्धन समुद्र किनार्यावरील सुशोभीकरण व तालुक्यात झालेली अनेक समाजमंदिर ही विकासकामे नाहीत. सुशोभिकरणाचा फायदा किती स्थानिकांना झाला त्याचप्रमाणे समाजमंदिर उभारत तटकरे कुटुंब प्रत्येक समाजाला भावुक करत आहेत. आता भावनांचे दिवस संपले आहेत. आता जनतेला परिवर्तन पाहिजे आहे. यावेळी सर्व समाज बांधवांना व समाज प्रतिनिधींना भेटलो असता प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करताना एकच सांगितले की, आम्हाला परिवर्तन पाहिजे आहे. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सामान्य कार्यकर्त्याविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची घराणेशाही अशी खरी लढत होणार आहे. 23 नोव्हेंबरला श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झालेला जनतेला दिसेल. असे मत मविआचे उमेदवार अनिल नवगणे यांनी मांडले आहे.
यावेळी माजी आमदार तुकाराम सुर्वे, श्रीवर्धन तालुका प्रमुख अविनाश कोळंबेकर, माजी सभापती बाबुराव चोरगे, उपशहर प्रमुख अजिंकेश भाटकर, युवासेना शहर अधिकारी शिवराज चाफेकर, शेतकरी कामगार पक्षाचे श्रीवर्धन तालुका सरचिटणीस वसंत यादव, संघटक अरूण शिगवण तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.