नगराध्यक्षा भावना घाणेकरांचा आ. बालदींवर घणाघात
| चिरनेर | प्रतिनिधी |
कुणाचे बाळ कडेवर घेतले म्हणून मूल त्याचे होत नाही, असा टोला लगावत 53 कोटी रुपये खर्चाच्या उरण बायपास रस्त्याचे श्रेय उपटू पाहणारे भाजप आमदार महेश बालदी आणि त्यांच्या समर्थकांना नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी चांगलेच धारेवर धरले. 18 वर्षांच्या संघर्षातून साकारलेल्या बायपासचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना 2029 च्या विधानसभा निवडणुकीत उरणची जनताच बायपास करेल, असा घणाघात त्यांनी केला. उरण बायपासचे संकल्पक आणि 18 वर्षे सातत्याने पाठपुरावा करणारे उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
मागील 18 वर्षांपासून सिडकोच्या अखत्यारीत रखडलेल्या उरण बायपास रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच दृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. मात्र, या रस्त्याची संकल्पना मांडून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या गोपाळ पाटील यांचा साधा नामोल्लेखही उद्घाटन कार्यक्रमात करण्यात आला नाही. उलट,भाजप आ. महेश बालदी यांनी रस्त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने उरणकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर रविवारी (31) सायंकाळी उरण बायपास रस्त्यावरच गोपाळ पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. उरण सामाजिक संस्था, आधार सावली फाऊंडेशन, उरण उत्कर्ष समिती, युवा सामाजिक संस्था आणि उरण तालुका चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
यावेळी उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांनी गोपाळ पाटील यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आणि संघर्षाचा गौरव केला. कबड्डीपटू, राजकारणी, नाट्यकलाकार, गायक आणि समाजसेवक अशा विविध भूमिका निभावताना त्यांनी उरण बायपाससाठी प्रदीर्घ लढा दिला. श्रेय घेण्यासाठी लावलेले पोस्टर आणि बॅनर दोन दिवसांत उतरले; मात्र 53 कोटींच्या बायपाससाठी गोपाळ पाटील यांनी केलेला पाठपुरावा जनतेच्या कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींपेक्षाही पलीकडे जाऊन त्यांनी काम केले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीतील उर्वरित 400 मीटर बायपास रस्ता 13 कोटींच्या निधीअभावी रखडला असून, त्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. या लढ्यात गोपाळ पाटील यांच्यासोबत सहभागी होण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
याप्रसंगी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, उरण तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील, उरण बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विजय पाटील, कामगार नेते व माजी जेएनपीए कामगार ट्रस्टी भूषण पाटील यांनीही बायपासचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नांवर टीका केली. खोपटा खाडी पुलाच्या जोडरस्त्यासाठी श्रमदानातून केलेले माती भरावाचे काम, करळ रेल्वे फाटक बंद करण्याच्या विरोधातील रेल्वे रोको आंदोलन, करळ उड्डाणपुलासाठी केलेला न्यायालयीन संघर्ष आणि उरण बायपाससाठी दिलेला लढा अशा गोपाळ पाटील यांच्या विविध सामाजिक कार्यांना त्यांनी उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना गोपाळ पाटील म्हणाले की, आपण केलेले काम पडद्याआड जाऊ नये आणि दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणाऱ्यांना पायबंद घालता यावा, यासाठीच नागरी सत्काराला संमती दिली. 18 वर्षांच्या संघर्षात नागरिक आणि पत्रकारांचाही मोठा वाटा आहे, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर आधार सावली फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा म्हात्रे, उरण उत्कर्ष समितीचे दीपक गावंड, युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हर्षल ठाकूर, कोमसापचे अध्यक्ष एल. बी. पाटील, शेकाप तालुका चिटणीस रवींद्र घरत, संतोष पवार, शिक्षक नेते दा. चां. कडू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या हेमलता पाटील यांच्यासह गोपाळ पाटील यांचे चाहते, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





