माथेरानमध्ये ताडपत्रीची खरेदी तेजीत

। माथेरान । वार्ताहर ।

पावसापासून घरांची गळती तसेच घोड्यांच्या तबेल्यांची व अन्न धान्यांच्या सुरक्षेसाठी ताडपत्री हे महत्वाचे साधन आहे. पावसाला सुरुवात झाली की माथेरान बाजारपेठेत ताडपत्री खरेदी तेजीत असते. याकरिता माथेरानमध्ये पावसाळापूर्व लागणारी ताडपत्री बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून या ताडपत्री खरेदीचा बाजार चांगलाच तेजीत आला आहे.

माथेरानच्या डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने मान्सून दारात येऊन ठेपला आहे. काही दिवसातच जोरदार पाऊस बरसण्यास सुरवात होणार आहे. याकरिता येथील नागरिक, हॉटेल व्यावसायिक, अश्‍वपालक हे आपल्या घरांसाठी, घोड्यांच्या तबेल्यासाठी तसेच घोड्यांचे खाद्य गवत, भुसा, कुट्टी हे सर्व पावसाळ्यापूर्वी व्यवस्थितपणे प्लास्टिक बंद करून व झाकून ठेवण्यासाठी ताडपत्री खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. तर, स्थानिक दुकानदार सुद्धा पावसाळ्यापूर्वी वाहणार्‍या जोराच्या वार्‍याने दुकानावरील छप्पर, पत्रे उडून नुकसान होऊ नये यासाठी अगोदरच ताडपत्री टाकून आणि ते व्यवस्थित बांधून ठेवत आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्लास्टिक ताडपत्रीच्या दरात वाढ झाली आहे. जाड ताडपत्री मागील वर्षी 100 रु. मीटर प्रमाणे मिळत होती. यंदा मात्र याचा दर 120 रु. मीटर झाला आहे आणि यापेक्षा कमी दर्जाचे प्लास्टिक 80 रु ते 100 रु. मीटर प्रमाणे विक्री होत आहे.

आमच्या घोड्यांच्या तबेल्यात पावसाचे पाणी जाऊ नये यासाठी ताडपत्रीचा वापर करण्यात येतो. त्यांना पावसाळ्यात लागणारा अन्नसाठा देखील आम्ही सर्व अश्‍वपालक जमा करून ठेवत असतो आणि तो अन्नसाठा येथे कधी अतिवृष्टीमुळे खराब होऊ नये, वाया जाऊ नये यासाठी काळजीपूर्वक येथे ताडपत्रीचा वापर करून बांधून ठेवला जातो.

जयराज बर्गे, अश्‍वचालक, माथेरान
Exit mobile version