जिल्ह्यात ग्रीन लिफ रेटिंग प्रणाली सुरू
| रायगड | खास प्रतिनिधी |
प्रमुख पर्यटन स्थळांवर स्वच्छता आणि स्वच्छता मानके सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पाणी व स्वच्छता विभाग आणि पर्यटन मंत्रालयाच्या विद्यमाने देशभरात ग्रीन लिफ रेटिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होम स्टे, धर्मशाळांमध्ये पर्यटकांना, नागरिकांना स्वच्छतेच्या दर्जेदार सेवा मिळण्यासाठी स्वच्छता हिरवे पान मानांकन (ग्रीन लीफ रेटिंग) प्रणाली रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार रायगड जिल्ह्यातील संबंधित आस्थापनांना मानांकन दिले जाणार आहे. पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यातील सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील पर्यटक अनुकूल स्वच्छता सुविधांचे मूल्यमापन करणे (ग्रीन लीफ रेटिंग इन हॉस्पिटॅलिटी फॅसिलिटीज) प्रस्तावित आहे. त्यामुळे सेवाक्षेत्रातील स्वच्छता सुविधा अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. मूल्यांकनामुळे अशा व्यावसायिक आस्थापनांमध्ये विधायक स्पर्धेचे वातावरण निर्माण होऊन त्याचा पर्यटनवृद्धीत उपयोग होऊन जिल्ह्याची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष
हिरवे पान मानांकनासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. उपाध्यक्षपदी मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य सचिवपदी पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तर सदस्य म्हणून पर्यटन विभाग किंवा एमटीडीसी जिल्हा प्रतिनिधी आणि जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेने पर्यटन किंवा हॉटेल उद्योगातील प्रतिनिधींचा त्यामध्ये समावेश असेल. तर, तालुकास्तर समिती उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदावर गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग उपअभियंता, स्वच्छ भारत मिशनचे विस्तार अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
तीन महत्त्वाच्या निकषावर मिळणार गुण
पाणवठ्यामधील प्रदूषण रोखून पर्यावरण स्वच्छ ठेवणे हा स्वच्छता ग्रीन लीफ रेटिंग प्रणालीचा उद्देश आहे. हिरवे पान मानांकन प्रणाली 200 गुणांची आहे. घनकचरा व्यवस्थापन 80 गुण, मैला गाळ व्यवस्थापन 80 गुण, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 40 गुण असणार आहेत.