कारवाईसाठी पोलिसांचा फौजफाटा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पोलिसांचा फौजफाटा घेऊन सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक मंगळवारी (दि. 1) कळंबोली गावात कारवाईसाठी दाखल झाले. कारवाईची कुणकुण लागल्याने कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी यावेळी कळंबोली गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना नेते बबन पाटील, काँग्रेस नेते सुदाम पाटील, भाजपा नेते रवी पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेवक विजय खाणावकर, शेकाप महिला आघाडीच्या सरस्वती काथारा यांनी पुढाकार घेत कारवाईसाठी आलेल्या सिडको अधिकार्यांसोबत चर्चा केली. चर्चेतून कोणतीही सकारात्मक बाब समोर न आल्याने तसेच सिडको अधिकारी कारवाईवर ठाम असल्याने अधिकार्यांसोबत झालेली चर्चा फिस्कटली असून, सिडकोच्या कारवाईला विरोध म्हणून मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला भरउन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.
यावेळी बोलताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सिडकोच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला असून, गरजेपोटी घरांच्या प्रश्नावर सिडको प्रशासनाने एकदाचा काय तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या अधिकार्यांनी आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणल्याने यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पथक हात हलवत माघारी
ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे अखेर सिडकोच्या पथकाला हात हलवत परतावे लागले. यावेळी बाळाराम पाटील, शिरीष घरत, बबन पाटील, रवींद्र भगत, गोपाळ भगत, अमर पाटील ग्रामस्थांसोबत आंदोलनस्थळी उपस्थित राहिल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.