| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका पोलिसांनी चांदणी साई निधी बार अँड ऑर्केस्ट्रावर कारवाई करत 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यात बारचे मालक बाबुराव म्हात्रे, बलविर सिंह मॅनेजर, पुरुष वेटर, महिला सिंगर यांचा समावेश आहे. 29 सप्टेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास चांदणी बार अँड ऑर्केस्ट्रा कोन गाव येथे सात महिला गायकांनी भडक वेशभूषा करून ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेल्या म्युझिकच्या तालावर गिर्हाईकांची लगट साधून अंगविक्षेप करून बीभत्स वर्तन करताना मिळून आल्या. शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले, तसेच बारचे मालक मॅनेजर व पुरुष वेटर यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना उत्तेजन दिल्याचे कारवाईदरम्यान दिसून आले. पनवेल परिसरात पुणे, पिंपरी चिंचवड येथून जास्त आंबट शौकीन बारमध्ये येतात. डान्स बारमध्ये नोटांचा अक्षरश: पाऊस पडतो. अवघ्या काही तासात लाखो रुपये उडवले जातात. त्यामुळे बारमालक, दलालांचे खिसेही काठोकाठ भरतात. त्यामुळे त्यांच्याकडून डान्स बार चालविला जातो. नियमांचे उल्लंघन होऊनदेखील याकडे अनेकदा डोळेझाक केली जाते. अशा नियम तोडणार्या बार अँड ऑर्केस्ट्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली जात आहे.