| पनवेल | वार्ताहर |
रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वे रुळाखाली असलेल्या नाल्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना नवीन पनवेल-खांदा कॉलनी रेल्वे रुळाजवळ घडली. या अपघाताची नोंद पनवेल रेल्वे पोलिसांकडे करण्यात आली आहे. अनिल दत्तात्रेय मुळजे (सेक्टर 7, नवीन पनवेल) आणि तुषार संजय कुलकर्णी (31, रा. कर्मवीर नगर, सातारा) अशी दोघांची नावे आहेत.
शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी अनिल मुळजे आणि तुषार कुलकर्णी हे नवीन पनवेल-खांदा कॉलनी येथील रेल्वे रूळ ओलांडून पुढे जात होते. यावेळी रात्रीच्या अंधारात त्यांना रेल्वे रुळाजवळ असलेला नाला दिसून आला नाही. दोघेही या नाल्यात पडले. जोरदार पाऊस असल्याने आणि दहा ते बारा फूट वरून खाली पडल्याने या दोघांचाही यात मृत्यू झाला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिक येथील उड्डाण पुलाचा वापर करत नाहीत. ते थेट रेल्वे रूळ ओलांडून नवीन पनवेल ते खांदा कॉलनी आणि खांदा कॉलनी ते नवीन पनवेल असा प्रवास करत असल्याने ते धोकादायक ठरत आहे.