जनावरांच्या वैरणीचा प्रश्‍न ऐरणीवर

पेंढा भिजल्याने हाल, बळीराजा चिंतेत
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
अवकाळी व परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान तर केलेच. मात्र झोडणी व मळणी नंतर शेतात रचलेला पेंढा देखील भिजला आहे. त्यामुळे गुरांचे वैरण भिजून गेले, पावसात पेंढा भिजल्याने कुजलेला आणि बुरशी आलेला हा पेंढा जनावरांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.
मागील आठवड्यात देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही शेतकर्‍यांनी गुरा-ढोरांच्या चार्‍यासाठीचा पेंढा/पेंढ्याच्या गंजी मात्र शेतातच ठेवल्या होत्या. मुसळधार पावसाने शेतात ठेवलेला सर्व पेंढा भिजला. भिजलेला हा पेंढा आता कूजु लागला असून त्यावर काळी बुरशी येऊ लागली आहे. त्यामुळे हा कुजलेला पेंढा गुरा-ढोरांच्या खाण्यालायक राहिलेला नाही. रानातील हिरवे गवत देखील आता सुकले आहे. अशा परिस्थितीमध्ये दुभत्या जनावरांचा आणि ढोरांना खायला काहीच राहिले नसल्याने काही दिवसांतच जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे.

Exit mobile version