आगामी अधिवेशनात सत्तेच्या दुरूपयोगाचे पडसाद

खासदार विनायक राऊतांचा इशारा ; भाजपवर साधला निशाना
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।

जनतेने विश्‍वासाने सोपविलेल्या सत्तेच्या दुरूपयोगाचे पडसाद आगामी अधिवेशानात उमटतील, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपाला दिला आहे. धुरीवाडा येथील हॉटेल दर्या सारंग येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खा. विनायक राऊत म्हणाले की, लखमपूर घटना, सीबीआय, ईडी, एनसीबीने राज्यात हैदोस घातला आहे. राज्यातील महाविकास आघाडी शासनाला आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्यासाठी सर्व यंत्रणा महाराष्ट्रात लावायची, हा जो काही सत्तेचा दुरूपयोग केंद्र शासन करत असून त्याचे पडसाद आगामी अधिवेशात उमटतील.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून माजी खा. नीलेश राणे यांनी रणशिंग फुकले असून याबाबत राऊत म्हणाले की, त्यांनी रणशिंग फुंकले नाही तर ती पिपानी आहे. आ. वैभव नाईक यांचे काम सर्वश्रुत आहे. त्यामुळे राणेंनी कितीही पिपानी फुंकावी आम्हाला त्यांची चिंता नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
याशिवाय, आडाळी एमआयडीसी विद्यमान सरकारने कार्यान्वित केली आहे. रस्त्याची कामे सुरू आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून एका नवा प्रकल्प होऊ घातला आहे. एमआयडीसी त्यांनी सुरू केली, मात्र ही प्रगतीत यावी, यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई जे प्रयत्न करत आहेेत, ते राणेंना दिसणार नाहीत. कारण त्यांना शिवसेना व महाविकास आघाडीची काविळ झाली असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.
तसेच खा. राऊत म्हणाले की, चिपी विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचे आवाहन राणे यांनी शिवसेनेला दिले आहे. पण त्यांचे आवाहान मी मानत नाही. इतिहास पाहता विमानतळाच्या नावाखाली 934 हेक्टर जमीन हडप करण्याचा प्रयत्न राणेंनी केला. हा विमानतळ प्रकल्प जर एमआयडीसीकडे असता तर चार वर्षांपूर्वीच ते सुरू झाले असते. मात्र राणेंच्या हट्टापायीच हा प्रकल्प खासगी ऑपरेटरकडे गेला. केवळ राणेंच्या अपप्रवृत्तीमुळे विमानतळ प्रकल्प आयआरबीकडे आला. राज्य शासन खंबीरपणे उभे राहिल्यानेच या विमानतळाचे काम पूर्ण झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, नितीन वाळके, नागेंद्र परब, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, आकांक्षा शिरपुटे, अंजना सामंत, तृप्ती मयेकर, किरण वाळके, सन्मेश परब, किसन मांजरेकर, बाळू नाटेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version