| अलिबाग । वार्ताहर ।
जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वारसा असलेली स्मारके, विविध स्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा, स्मारकांचा वारसा टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी घारापूरी-एलिफंटा येथे केले.
जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून दि.19 ते दि.25 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून एलिफंटा लेणी, घारापुरी येथे या सप्ताहाच्या उद्घाटनपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
घारापूरी लेणी या विषयावरील पी.एच.डी संपादन केलेल्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.अनिता राणे-कोठारे एलिफंटा केव्ज – न आर्किटेक्चरल मार्व्हल या विषयावरील माहिती देताना म्हणाल्या की, मुंबई शहर हे सात बेटे आणि 66 द्वीप यांनी मिळून बनले आहे. भारतातील दोन तृतीयांश लेण्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहेत. वारा-पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी प्राचीन काळापासून भिक्षू या लेण्यांचा आसरा घेत असत. एलिफंटा लेणी ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झाली आहे असे सांगितले.
यावेळी अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, मुंबई सर्कल डॉ.राजेंद्र यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.अनिता राणे-कोठारे, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, एलिफंटाचे सरपंच बळीराम ठाकूर, माजी सरपंच राजेंद्र पडते यांची प्रमुख उपस्थिती होती.