परतीच्या पावसाने केरळमध्ये हाहाकार

उत्तरखंडातही धुमाकूळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये भूस्खलानसह महापूराची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय दिल्लीतही तुरळक पाऊस पडला. भारताच्या हवामान विभागाने हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट दिला आहे.
केरळमध्ये पावसाने थैमान घातलं असून राज्यात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते. इडुक्की आणि कोट्टायमसह पठानमथिट्टा या पर्वतीय भागांमध्ये पुराचा फटका बसला आहे.
याशिवाय उत्तर प्रदेशातील काही भाग आणि पंजाबच्या काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रात 11 जिल्ह्यात यलो अ‍ॅलर्ट
महाराष्ट्रातसुद्धा 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्याचा समावेश आहे. सकाळपासून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढच्या 24 तासात राज्यातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Exit mobile version