श्रीमंत ग्रामपंचायतीचा गरीब रस्ता

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

वडगांव गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना खड्डेमय रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे श्रीमंत आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा रस्ता येत असतानाही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वडगांव गावाकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठंमोठे खड्डे पडले असून, काही भागात रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांनाही या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रुप ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र, केवळ आश्वासने मिळत असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असून, ग्रामपंचायतीने रस्ता तयार करण्याकरता परवानगी मागितलेली आहे. मात्र, आजपर्यंत परवानगी मिळालेली नाही. तसेच, हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये घेण्यात आल्याचे समजते.

सुहास वारे,
ग्राम विकस अधिकारी, वडगाव
Exit mobile version