अपंग व्यक्तींना वस्तूंचे वाटप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अपंगत्व आलेल्या प्रत्येक व्यक्तीला योग्य उपचार, उत्तम प्रतीचे कृत्रिम साधन मिळणे, हा त्यांचा स्वतंत्र भारतात हक्क असला पाहिजे. प्रत्यक्षातील या संबंधीचे चित्र भयानक आहे. ज्या अपंग व्यक्तींच्या पालकांकडे पैसा आहे, ते उपचार करून सुसह्य आयुष्य जगतात. ज्यांच्याकडे पैसा नाही, ते अपंगत्व पूर्ण जाईल व परत कमवता येईल या आशेने शेती विकतात किंवा कर्ज घेतात. त्यामुळे अपंगत्वाबरोबर आर्थिक संकटाने पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. लोकशाहीत या सर्व गोष्टींचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा या आघाडीवर दोन दिशेने कार्य करणे आवश्यक आहे असे उद्गार न्यूरो स्पायनल सर्जरीचे जनक डॉ. पी.एस. रामाणी यांनी काढले. मुंबईतील हाजीअली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलॅटेशन या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावेळी त्यांच्या हस्ते अपंग व्यक्तींना मदत म्हणून व्हीलचेअर्स, अपंग सायकली इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर अनिलकुमार गौर, शांता दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी भूषण जाक, एमएसडब्लू डिपार्टमेन्टच्या प्रमुख अंजना नेगलूर उपस्थित होते. डॉ.रामाणी पुढे असेही म्हणाले की, एका अपंगाचे भले झाल्यास त्याच्या कुटुंबातील सरासरी पाच व्यक्तींचे आयुष्य स्थिरस्थावर होण्यास मदत होते. म्हणूनच अपंगांना आता इतर सरकारी योजना आणि सवलतींवर अवलंबून राहावे लागते आहे. या सवलती मिळवण्यासाठी अपंगांना करावी लागणारी कागदपत्रांची जुळवाजुळव वेळकाढू आणि कटकटीची बनते. त्यामुळे अनेकजण या योजनांपासून वंचित राहतात. परिणामी कोणीतरी बोगस व्यक्ती या योजनांचा लाभ उठवतो. म्हणूनच अपंगांनी आपल्यासाठी असलेल्या योजनांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. अपंग कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली असती, त्यासाठी सुसूत्र अशी योजना करून त्याची अंमलबजावणी अपंगांचा सहभाग घेऊन केली असती, तर भारतीय अपंग आजच्या हलाखीच्या अवस्थेत नसता. प्रत्यक्षात स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षानंतरही भारतातील बहुसंख्य अपंगांची स्थिती जगण्यापेक्षा मरण बरे, अशी आहे. याची कारणे काय असतील, याचा शोध घेण्याची गरज आहे.