24 तासांत रुग्णसंख्या 11 हजारपार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. देशभरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे सरकारसह सर्वसामान्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य मंत्रालयान शुक्रवारी (दि.14) दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 109 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 49 हजारांच्या पुढे गेली आहे.
देशात एका दिवसापूर्वी म्हणजेच दि.13 च्या आकडेवारीनुसार 1000 नवीन रुग्णांची भर पडली होती. यावरून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव किती वेगाने होतोय, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दि.13 रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे 10 हजार 158 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, कोरोनाबाधितांची संख्या पुढील 10 दिवसांत आणखी वाढणार आहे. परंतु त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येईल. नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.
दरम्यान, राज्यातही कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी (दि.13) महाराष्ट्रात 1 हजार 86 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.