भातशेतीचे नुकसान; शेतकरी हवालदिल
| कोलाड | प्रतिनिधी |
जिल्ह्यात सतत तीन-चार दिवस पडलेल्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यातच रोहा तालुक्यातील कोलाड येथील गोवे गावातील रस्ता या पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन गोवे गावात जाण्यासाठी रिक्षा, चारचाकी व इतर वाहनांना जागाच राहिली नसल्याने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. याशिवाय या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांनी पेरून ठेवलेला राब देखील कुजून गेल्याने भात लावणी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. दरम्यान, पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार यंदा पाऊस कमी पडेल, असे बोलले जात होते. त्यामुळे यंदा एक महिना उशीरा पावसाने सुरुवात केली. मात्र, असे असली तरी दि.5 ते 8 जुलै रोजी पडलेल्या तुफान पावसामुळे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या पावसात रोहा तालुक्यातील कुंडलिका व महिसदरा दोन्ही नदीच्या बेचक्यात असणाऱ्या गोवे गावाची अवस्था अतिशय बिकट झाली होती. गोवे गावाला पुराच्या पाण्याने घेरले. त्यामुळे येथील भातशेती पुर्णपणे पाण्यात बुडाली. काही दिवसांपुर्वी टाकलेला राब देखील या पुराच्या पाण्यात कुजून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांकडे लावणी करण्यासाठी राब राहिलेला नाही. पूर्वी या परिसरात उन्हाळी व पावसाळी अशी दोन्ही पिके घेतली जात होती. परंतु, मूठवली बंधारा जीर्ण झाल्यामुळे येथे उन्हाळी भातशेती करणे अवघड झाले होते. त्यानंतर खा. सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने 1 कोटी रुपये खर्च करून मूठवली बंधारा बांधण्यात आला. परंतु, त्याला सात-आठ वर्षे उलटून गेली तरी अद्याप उन्हाळी भातशेतीला पाणी मिळालेले नाही. त्याल कोलाड पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी फक्त धरण बांधण्यात आले असून, पाणीपुरवठा करणारे कालवे, पोटकालवे व मोऱ्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच, अनेक वर्षांपासून या नदीला अनेक ठिकाणी गेलेल्या खांडीमुळे पावसाळी भातपीक घेणे देखील कठीण झाले आहे. दरम्यान, याबाब लोकप्रतिनिधींकडून देखील कोणताचा पाठपूरावा होत नसल्याचे शेतकऱ्यांमधून होत आहे. तसेच, गोवे गावात जाण्यासाठी सुसज्ज बनविण्यात आलेला रस्ता या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावात जाणाऱ्या रिक्षा, मिनिडोअर, चारचाकी व इतर वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. दरम्यान, पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
पाटबंधारे विभागाचे
गेल्या सात-आठ वर्षांपासून गोवे गावातील शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे येथील शेतकरी वर्गाला दुबार पिक घेण्े अवघड झाले आहे. अनेक वेळा पाटबंधारे विभागाकडे नदीला गेलेल्या खांडी भरण्यासाठी व संरक्षण भिंती बांधण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यानंतर पाटबंधारे विभागाकडून थातूर मातुर काम केले जाते आणि पावसाळा सुरू झाली की परिस्थिती जैसे थे अशीच राहते. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर येथील शेतकरी आणि भात पिक कायमचा नामशेष होऊन जाईल, असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.
25 वर्षांपूर्वी गोवे गावातील शेतकरी उन्हाळी व पावसाळी अशी वर्षातून दोन्ही पिके घेत होता. त्यामुळे संपूर्ण वर्षाचा खर्च भागवून शेतकऱ्याच्या गाठीला पैसे शिल्ल्क रहात होते. परंतु, आता परिस्थिती उलट असून गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळी पाटबंधारे विभागाच्या आडमुठपणाचे धोरण व पावसाळी निसर्गाचा कोप यामुळे या गावातील भातशेती संकटात सापडत आहे. त्यातच मजुरी, मशागतीची कामे, खताच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली असली तरी शेतकरी भातशेतीची कामे करीत आहे. परंतु, त्याच्या पदरी निराशाच येत आहे. त्यामुळे यापुढे पाटबंधारे विभागाने महिसदरा नदीला गेलेल्या खांडी व इतर कामे करून पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा. त्यामुळे दोन्ही पिके पूर्ववत सुरु होतील.
– राजेश शिर्के, अध्यक्ष, शेतकरी व गावकमेटी, गोवे
