किल्ले रायगड मार्गावरील रस्त्याची नादुरुस्ती

मनसेचा आंदोलनाचा इशारा

| महाड | प्रतिनिधी |

मागील दोन वर्षांपासून हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्‍या किल्ले रायगडच्या दुरुस्तीची कामे वेगात सुरू असतानाच मार्गाचे प्रवेशद्वार असणार्‍या नातिखिंडपासून नाते गावाच्या हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात मनसेचे शहराध्यक्ष दीपक चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन देऊन तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

महाडपासून रायगड किल्ल्याच्या जाणार्‍या रस्त्याची कामे सुरू होऊन दोन वर्षेदेखील झाली नाहीत तोच रस्त्यावरील खडी बाहेर येणे, रस्त्याच्या दुतर्फा काँक्रीटला तडे जाणे, रस्त्याला तडे जाणे, दुभाजक कामाकरिता ठेवण्यात आलेल्या लोखंडी शिगा धोकादायकरित्या बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. या मार्गाची ही अवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही, या कामाची त्वरित पाहणी करून आपल्या विभागामार्फत या कामाच्या दर्ज्याची देखील तपासणी करावी, अन्यथा आम्ही या कामाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करून पुढील काम बंद पाडू, असे मनसेकडून या निवेदनातून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version